
कोरोनाबाबत दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
रत्नागिरी : चीन, जपान, अमेरिका, ब्राझील आदी देशांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. योग्य ती दक्षता घेणे गरजेचे आहे, त्यासाठी जनतेने खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
चीनमध्ये कोरोनाचा ‘बीएफ 7’ हा उपप्रकार अधिक वेगाने पसरत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर करोना रुग्ण वाढत असताना कोकणात कोरोनास्थितीवर पूर्ण नियंत्रणात असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या अहवालावरून महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात राज्यात कोरोना रुग्णांची संख्या त्यापूर्वीच्या आठवड्याच्या तुलनेत 30 टक्क्यांनी कमी झाली आहे. कोरोनाविषयक चाचण्या सकारात्मक (पॉझिटिव्ह) येण्याचे शेकडा प्रमाण 0.29 एवढे कमी आहे. संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयांमध्ये दाखल होणार्या रुग्णांचे प्रमाणही दिवसेंदिवस कमी होत आहे.
कोरोनाच्या या उपप्रकारामुळे भीती बाळगण्याची गरज नसली तरी आवश्यक ती दक्षता घेण्याची गरज आहे. कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी काळजी घेण्याबरोबरच लसीकरणावर भर द्यावा, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा, लहान मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने केले आहे.