
रत्नागिरीत चिमुकल्यांचा कलाविष्कार अन् किलबिलाटात बालदिन साजरा; प्रभाग क्रमांक 5 व 6 मध्ये बालमहोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी : चिमुकल्यांच्या चित्रकलेचा आविष्कार, विविध वेशभूषा केलेल्या चिमुकल्यांची फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि डीजेच्या तालावर चिमुकल्यांचा किलबिलाट अशा जल्लोषमय वातावरणात बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक 5 व 6 मध्ये हा बाल महोत्सव उत्साहात पार पडला.
मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून या बालमहोत्सवाचे आयोजन माजी नगरसेविका शिल्पा सुर्वे, उद्योजक सौरभ मलुष्टे, पूजा व दीपक पवार, मनोज साळवी यांनी केले होते. बालवाडी ते आठवीपर्यंतच्या मुलांची चित्रकला व रंगभरण स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात पार पडली. याचा बक्षीस वितरण समारंभ व बालमहोत्सव स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह येथे घेण्यात आला. उद्योजक किरण उर्फ भैया सामंत, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, राजन शेट्ये, बिपिन बंदरकर, बारक्या हळदणकर, अभिजित दुड्ये, पप्पू सुर्वे, सुनील शिवलकर यांची उपस्थिती यावेळी लाभली.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, चिमुकल्यांना त्यांचा दिवस एन्जॉय करता यावा, यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले होते. कायम अभ्यासात गुंग असणार्या चिमुकल्यांना असे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास त्यांच्यातील कलागुणांना चालना मिळते, असे मत माजी नगरसेविका शिल्पा सुर्वे व मान्यवरांनी व्यक्त करत या कार्यक्रमाचे व गुणवंत चिमुकल्यांचे कौतुक केले.
चित्रकला स्पर्धेत सुमारे साडेतीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. फॅन्सी डे्रस व मनोरंजनात्मक खेळांना देखील चिमुकल्यांचा प्रतिसाद लाभला. स्वा. सावरकर नाट्यगृह येथे झालेल्या या बक्षीस वितरण कार्यक्रमाला सुमारे पाचशे विद्यार्थी व पालक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काव्या कामतेकर, प्रिया साळवी, अथर्व पांगम, मानसी साळुंखे, राजा साळवी यांनी सहकार्य केले.