
आयुष्मान आरोग्य योजनेला चार वर्ष पूर्ण झाल्याने रत्नागिरीत आरोग्य मेळा
केंद्र शासनाच्या आयुष्मान आरोग्य योजनेला नुकतीच चार वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने आयुष्मान पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून आयुष्मान भारत आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेसाठी आरोग्य मेळा घेण्यात आला. या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी डॉ. सविता लष्करे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, उत्तम कांबळे, अधिसेविका जयश्री शिरधनकर, पत्रकार जान्हवी पाटील या कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. रेणुका चौगुले, डॉ. नेहा विटेकर, डॉ. मंजू देहेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. संघमित्रा फुले यांनी या आरोग्य योजनेबाबत यावेळी माहिती दिली. कोव्हिड व त्यानंतरच्या कालावधीत या ठिकाणी मनुष्यबळ कमी असूनही संपूर्ण कामकाज करणार्या डॉक्टर्स व कर्मचार्यांनी चांगले काम केलेले आहे, असे त्या म्हणाल्या. आपण वैद्यकीय पदवीधारक असूनही प्रशासकीय सेवेत आलो आहोत यामुळे प्रशासकीय कामासोबतच सामाजिक सेवेचीही संधी मिळाली, असे डॉ. सविता लष्करे यावेळी म्हणाल्या. या ठिकाणच्या कामाचे त्यांनी आपल्या भाषणात कौतुक केले. उत्कृष्ट कार्याबद्दल यावेळी आरोग्य मित्र साईनाथ भटकर आणि रचना तांडेल यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास आस्मा सय्यद, संकेत नागवेकर, डॉ. कोमल हुले, ऋषिकेश धवलकर, शैलेश घाणेकर, संकेत हातीसकर यांच्यासह कर्मचारी, नर्सिंग विद्यार्थींनी तसेच रुग्ण व त्यांचे नातेवाईक आदींची उपस्थिती होती.