उभ्या असलेल्या वाहनाला अचानक गाडी धडकणे, मागून एखादी गाडी धडकणे असे प्रकार हायवेवर घडण्यामागचे मूळ कारण ‘हायवे हिप्नोसिस’… अशी घ्यावी काळजी
‘हायवे हिप्नोसिस’ म्हणजे नेमकं काय? ‘हायवे हिप्नोसिस’ याला रोड हिप्नोसिस असेही ओळखले जाते. हिप्नोसिस या शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे संमोहन. ‘हायवे हिप्नोसिस’ ही अशी एक शारीरिक स्थिती आहे ज्याची कल्पना बहुतांश चालकांना अजिबातच नसते. एखाद्या मोठ्या हायवेवर गाडी चालवताना चालकामध्ये किंवा गाडीत बसलेल्या प्रवाशांना एका विशिष्ट प्रकारची मोनोटोनी येते. यामुळे लक्ष विचलित होते. यालाच ‘हायवे हिप्नोसिस’ असे म्हणतात. रस्त्यावर वाहन चालवताना साधारण 2.5 तासांनी ‘हायवे हिप्नोसिस’ होऊ शकते. यावेळी संमोहीत चालकाचे डोळे उघडे असतात, पण मेंदू मात्र क्रियाशील राहत नाही. तो डोळ्यांनी काय पाहतो हे त्याला समजत नाही. याचे परिणाम चालकावर स्पष्टपणे दिसतात. तुमच्यासमोर उभ्या असलेल्या वाहनाला अचानक गाडी धडकणे, मागून एखादी गाडी आपल्या गाडीला येऊन धडकणे असे प्रकार हायवेवर घडण्यामागचे मूळ कारण ‘हायवे हिप्नोसिस’ आहे. मुंबईत किंवा ट्राफिकच्या ठिकाणी गाडी चालवताना हे प्रकार सहसा आढळत नाहीत. कारण या ठिकाणी गाडी चालवताना तुमच्यासमोर अनेक अडथळे असतात. यामुळे आपण संमोहित होत नाही. जर तुम्ही हायवेवर गाडी चालवत आहात आणि तुमच्या डोळ्यांना तोच तोच पणा दिसत असेल तर तुम्हाला ‘हायवे हिप्नोसिस’ झालंय हे ओळखावे. यावेळी चालक हा वेगळ्या ट्रान्समध्ये जातो. मनात तुमच्या तेच तेच विचार येत असतात. बर्याच वेळा गाड्या काय वेगाने चालल्यात हे देखील समजत नाही. गाडीचा वेग किती वाढला, किती कमी झाला हे देखील कळत नाही. त्यामुळे हे अपघात होतात. परदेशात ‘हायवे हिप्नोसिस’मुळे अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. परदेशातील रस्त्यांना दोन्ही बाजूंनी विशिष्ट प्रकारचे बोर्ड लावलेले असतात. त्यामुळे चालक हा संमोहित होतो. यामुळे अनेकदा गाड्या एकमेकांवर आदळतात. भारतात याचे प्रमाण कमी असले तरी नाकारण्यायोग्य नक्कीच नाही. अनेकदा भारतातही ‘हायवे हिप्नोसिस’मुळे अपघात झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘हायवे हिप्नोसिस’ झालेल्या चालकाला गाडीचा अपघात होईपर्यंत किंवा ती गाडी आदळेपर्यंत शेवटच्या 15 मिनिटात काहीही आठवत नाही. गाडीचा चालक किती वेगाने गाडी चालवत आहे, तो काय करतोय याचे त्याला काहीही भान नसते. विशेष म्हणजे समोरच्या दिशेने एखादी गाडी येत असेल तर त्याचा अंदाजही त्याला लावता येत नाही. तसेच हायवेवरील गाड्यांचा वेग हा साधारण 80 ते 100 कि.मी असतो. त्यामुळे जर गाड्यांची टक्कर झाली तर प्रचंड नुकसान होते. प्रसंगी माणसाला जीवही गमवावा लागतो. जर तुम्हाला ‘हायवे हिप्नोसिस’पासून स्वतःचे संरक्षण करायचे असेल तर चालकाने दर दीड ते दोन तासांनी गाडी थांबवावी. यावेळी त्याने चहा-कॉफी घ्यावी, जेणेकरुन त्याची सुस्ती उडेल. तसेच शक्य असेल तर थोडी विशांती घ्यावी. गाडी रस्त्याच्या कडेला किंवा एका बाजूला उभी करुन 10 मिनिटे चालावे. तसेच डोळ्यावर पाणी मारावे, जेणेकरुन डोळ्यावरील ताण कमी होईल. तसेच चालकाने पुरेशी झोप घेतली आहे की नाही याचीही खात्री करणे गरजेचे आहे. त्यासोबत ड्रायव्हरच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीने झोप घेण टाळलं पाहिजे. त्याच्यासोबत गप्पा मारायला हव्यात. छान गाणीही गाडीत लावायला हवी.