पारदर्शक व जलद ग्राहक सेवेच्या दिशेने… महावितरणची डिजिटल पावले

  रत्नागिरी :  24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी 1986 साली ग्राहक हक्क कायद्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली. या कायद्यानुसार ग्राहकांना सुरक्षेचा, माहितीचा, निवडीचा, म्हणणे ऐकले जाणे, तक्रार निवारणाचा व ग्राहक शिक्षणाचा हक्क हे सहा हक्क प्राप्त झाले. या हक्काच्या संरक्षणाच्या संदर्भाने देशातील व आशियातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील विद्युत वितरण कंपनी असलेल्या महावितरणने ठोस पाऊले उचलली आहे. ग्राहकांना स्वस्त दरात अखंडित व दर्जेदार वीजसेवा देऊन राज्य व देशाच्या शाश्वत विकासात योगदानासाठी महावितरण वचनबध्द आहे. त्यादृष्टीने महावितरणने नागरिकांची सनद जाहिर करून ग्राहक सेवेची कृती मानके निश्चित केली आहेत.

                      घरगुती, कृषी, वाणिज्य, औद्योगिक वर्गवारीतील साधारणपणे 2 कोटी 78 लक्ष वीजग्राहकांना महावितरण वीजसेवा पुरविते. राज्यात महावितरणचे 4117 उपकेंद्रे, 8 लक्ष 25 हजार वितरण रोहित्रे, 10 लक्ष 60 हजार किलोमीटरच्या उच्च-लघुदाब विद्युत वाहिन्या असे पायाभुत सुविधांचे अजस्त्र जाळे पसरले आहे. राज्यात 77 हजारहून अधिक कर्मचारी 4 प्रादेशिक कार्यालये, 16 परिमंडळ, 46 मंडळ, 147 विभाग, 662 उपविभाग व 3887 शाखा कार्यालये अशी प्रशासकीय संरचना आहे. महावितरणने 5 एप्रिल 2022 रोजी 24668 मेगावॅटचा विक्रमी वीजपुरवठा केला. सध्याची उच्चांकी वीजेची मागणी साधारणपणे 23 हजार मेगावॅटपर्यंत आहे. महसूल 80 हजार कोटीहून अधिक आहे. महावितरणनेजलद, पारदर्शक व प्रभावी ग्राहकसेवेसाठी माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे आधुनिकीकरणाची कास धरली आहे. संकेतस्थळ, मोबाईल ॲप, ग्राहक सेवा केंद्राचे टोल फ्री क्रमांक, एसएमएस, ईमेल इ.माध्यमातून ग्राहकांना डिजिटल पध्दतीने नवीन वीजजोडणी, नाव व पत्ता बदल, वर्गवारी व भार बदलणे, वीजपुरवठा खंडित, वाढीव वीजबिल बाबत तक्रार इ. सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. कर्मचाऱ्यांनाही डॅशबोर्ड, मोबाईल ॲप, एम्प्लॉई मित्र पोर्टल व ॲप, दैनंदिन कामासाठी विविध प्रणाली इ. माध्यमातून डिजिटल सेवा- सुविधा दिल्या आहेत.

महावितरण संकेतस्थळ- ग्राहक, कर्मचारी व पुरवठाधारक या तीन्ही घटकांसाठी www.mahadiscom.in या अधिकृत व अद्यावत संकेतस्थळावर आवश्यक त्या सर्व सेवा-सुविधा, परिपत्रके, नियम इ. माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून दिलेली आहे.

महावितरण मोबाईल ॲप- महावितरण मोबाईल ॲपव्दारे वीजग्राहकांना सर्व सेवा उपलब्ध केलेल्या आहेत. ग्राहकांना हा ॲप महावितरणचे अधिकृत संकेतस्थळ किंवा गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअर वरून डाऊनलोड करता येईल. या ॲपवर मागील आणि चालू बिलांची व पावत्यांची पाहणी, नेटबॅंकिंग, क्रेडीट/डेबिट कार्ड, मोबाईल वॉलेट इत्यादी व्दारे वीजबिल भरणा, नवीन वीज जोडणी अर्ज, नावात वा वीजभारात बदल करणे,मोबाईल क्रमांक/ ई-मेल आयडी अद्ययावत करणे, ग्राहकांचे मीटर रिडींग उपलब्ध न झाल्यास मीटर फोटोसह रिडींग पाठविण्याची सोय, महावितरण सेवा विषयी अभिप्राय, तक्रारी नोंदविणे, वीज वापर तपासणे, ग्राहक सेवा केंद्राचे क्रमांक आदी सेवा-सुविधा आहेत. सातत्याने अद्यावत होणाऱ्या, ग्राहकांचे समाधान करणाऱ्या या ॲपच्या वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

महावितरण ग्राहक सेवा केंद्र- वीजग्राहकांच्या शंकासमाधान व तक्रार निवारणासाठी महावितरणचे ग्राहक सेवा केंद्र 24/7 सेवेत आहेत. त्याचे टोल फ्री क्रमांक 1800-212-3435, 1800-233-3435 हे आहेत. शिवाय राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक 1912 व  19120 हे आहेत. वीजपुरवठा खंडितची तक्रार नोंदविण्याकरीता 022-50897100 या क्रमांकावर मिस्ड कॉल देणे  किंवा 9930399303 या मोबाईल क्रमांकावर NOPOWER <12 अंकी ग्राहक क्रमांक> असा ‘एसएमएस’ पाठवणे अशी सेवा ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

महावितरणची एसएमएस’ सेवा- महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनावीज पुरवठा खंडित कालावधी, वीज बिल, मीटर रिडींग, ग्राहकजागृती विषयक इ. माहिती ‘एसएमएस’व्दारे पाठविली जाते. सदरील ‘एसएमएस’चा सेंडर आयडी हा VK-MSEDCL, VM-MSEDCL, AM-MSEDCL, JM-MSEDCL असा असतो. ग्राहकांनी आपला मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी https://pro.mahadiscom.in/ConsumerInfo/consumer.jsp या लिंकवर महावितरणकडे नोंदवावा.

ऑनलाईन वीज बिल भरणा सेवा- गत नोव्हेंबर महिन्यात राज्यातील 1 कोटी 11 लक्ष ग्राहकांनी ऑनलाईन पध्दतीने 2 हजार 230 कोटी रूपये वीजबिलापोटी भरले आहेत. महावितरणचे अधिकृत संकेतस्थळ किंवा महावितरण मोबाईल ॲपव्दारे वीजग्राहक वीज बिल भरणा क्रेडीट कार्ड/ डेबिट कार्ड, नेट बँकिंग, युपीआय इत्यादी इलेक्ट्रानिक माध्यमांमार्फत करू शकतो. ऑनलाईन वीज बिल भरण्याची सुविधा निशु:ल्क (क्रेडीट कार्डव्दारे वगळून) आहे. शिवाय वीजबिलात 0.25 टक्के सुट आहे. सदर पध्दतीमध्ये ऑनलाईन वीज बिल भरणे सुरक्षित असून याकरीता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या  पेमेंट ॲन्ड सेटलमेंट ॲक्ट  2007 च्या तरतुदी लागू आहेत. ऑनलाईन वीज बिल भरल्यास ग्राहकांना एसएमएस व भरणा पावती दिली जाते. ऑनलाईन वीज बिल भरण्यातील अडचणीसाठी एक स्वतंत्र मदत कक्ष महावितरणच्या मुंबई येथील प्रकाशगड मुख्यालयात स्थापन केला आहे. येथे helpdesk_pg@mahadiscom.in या ई-मेल आयडीवर तक्रारीचे निवारण केले जाते.

पर्यावरणपुरक ग्रो-ग्रीन सेवा – राज्यातील 3 लक्ष 56 हजार ग्राहकांनी गो ग्रीनसाठी नोंदणी केली आहे. गो ग्रीन सेवेसाठी नोंदणी करणाऱ्या ग्राहकांनादरमहा छापील वीज बिलाऐवजी ई-मेल आयडीवर वीज बिल पाठविले जाते. शिवाय वीजबिलात 10 रूपयांची सुट दिली जाते. ग्राहकांना आपल्या चालु मासिक वीजबिलाच्या छापील प्रतीवरील ग्राहक, बिलींग युनिट व गो ग्रीन क्रमांक (बिल नंबर) च्या सहाय्याने महावितरणच्या  अधिकृत संकेतस्थळावर https://pro.mahadiscom.in/Go-Green/gogreen.jsp या लिंकवर ‘गो-ग्रीन’ सेवेकरीता नोंदणी करता वा हटविता येईल.

समाजमाध्यमांव्दारे ग्राहकांच्या सेवेत- महावितरण फेसबुक, ट्विटर, युट्युब इ. समाजमाध्यमाव्दारे ग्राहकांना माहितीप्रेषणाचे व ग्राहकांच्या समस्या निराकरणाचे कार्य करते आहे.

ग्राहकांना पारदर्शक व जलद सेवा मिळावी, ग्राहकांची वेळ ,पैसा व ऊर्जा बचत व्हावी, या हेतुनेच महावितरणने डिजिटल सेवा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ग्राहकांनी सर्व डिजिटल सेवा-सुविधांचा लाभ घेतला पाहिजे.

किशोर खोबरे,

जनसंपर्क अधिकारी,

महावितरण, 

काेकण परिमंडळ.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button