‘गाव तेथे मानसोपचार’ अंतर्गत होणार व्यसनाविषयी जनजागृती; रत्नागिरी शहरातील मानसोपचार तज्ज्ञ घेणार पुढाकार

रत्नागिरी : गाव तिथे मानसोपचार अंतर्गत ‘नशामुक्त भारत, स्वस्थ भारत’ या घोषवाक्यासह विविध शाळा कॉलेजमध्ये तसेच विविध गटांमध्ये जाऊन मनोविकारतज्ज्ञ विद्यार्थ्यांमध्ये व तरुणांमध्ये व्यसनांविषयी दि. 26 जून ते 31 जुलै दरम्यान जनजागृती करणार आहेत.
शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य हे सर्वांगीण आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. भारतात आजही मानसिक स्वास्थ्य आणि त्या निगडित आजारांविषयी, त्यांच्या उपचाराविषयी गैरसमज आहेत. शारीरिक आजार असेल तर फक्त त्या एका व्यक्तीला त्रास होतो. पण मानसिक आजार असेल तर मात्र त्यामुळे पूर्ण कुटुंबाला त्रास होतो. पूर्ण कुटुंब विस्कळीत होते. राज्यभरातील समविचारी मानसोपचार तज्ज्ञांनी एकत्र येऊन गाव तिथे मानसोपचार- राज्यव्यापी मनस्वास्थ्य जनजागृती अभियान या अनोख्या समाजप्रबोधनपर उपक्रमाची सुरूवात केली आहे. गाव तेथे मानसोपचार या अंतर्गत अनेक मानसोपचारतज्ज्ञ स्वतः पुढाकार घेऊन सामुदायिक पातळीवर विविध कार्यक्रम घेत असतात. ज्यामध्ये शाळा, महाविद्यालये, विविध संस्था या ठिकाणी चर्चासत्र आयोजित करणे, जागरूकता अभियान राबवणे, गाव पातळीवर आणि वस्ती पातळीवर कॅम्प घेणे, समाजातील तरूणांना व्यसनमुक्तीबद्दल मार्गदर्शन करणे अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मानसिक आजाराविषयी गैरसमज व कलंकाची भावना दूर करणे जेणेकरून लोक इतर आजारांप्रमाणे मानसिक आजारांना स्वीकारतील. त्यावर योग्य प्रकारे उपचार घेतील व त्यामुळे रुग्णाची व सर्व कुटुंबियांची फरफट व त्रास थांबेल असा आहे.
या अभियानाचे पहिले तीन टप्पे याआधी यशस्वीरित्या पार पडलेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये एप्रिल 2018 मध्ये नैराश्याचा आजार या विषयी जनजागृती करण्यात आली होती. ज्यामध्ये महाराष्ट्रातील 40 मनोविकारतज्ज्ञांनी महाराष्ट्रभर जनजागृती केली होती. त्यानंतर जून 2018 मध्ये स्किजोफ्रेनिया (छिन्नमनस्कता) या आजाराबाबत महाराष्ट्रातील 148 मनोविकारतज्ज्ञांनी महाराष्ट्रभर जनजागृती केली होती. तिसरा टप्पा मार्च 2019 मध्ये घेण्यात आला होता त्यामध्ये ‘मुलांना समजून घेताना’ या घोषवाक्यासाह मुलांच्या मानसिक आरोग्यविषयी जनजागृती केली होती. यावेळी 206 मनोविकारतज्ज्ञांनी महाराष्ट्रातील विविध शाळेत व कार्यक्रमांत जाऊन पालकांमध्ये व शिक्षकांमध्ये जनजागृती केली होती.
या मानसिक आजारातील एक सर्वात मोठा आजार म्हणजे व्यसनांचा आजार. सध्याच्या काळात आणि विशेषतः कोरोना नंतर तरूणांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढल्याचे लक्षात आले आहे आणि याला आळा घालणे महत्त्वाचे आहे. हे लक्षात घेऊन चौथ्या टप्प्यात नशामुक्त भारत, स्वस्थ भारत या घोषवाक्यासह व्यसनांच्या आजारांविषयी राज्यभरात जनजागृतीचा प्रयत्न केला जाणार आहे. हा चौथा टप्पा 26 जूनला सूरू होणार असून ते 31 जुलैला याची सांगता होणार आहे. या वेळचे विशेष म्हणजे इंडियन सायकियाट्रिक सोसायटी (वेस्टर्न झोन) यांच्या सहयोगाने महाराष्ट्र, गोवा, गुजरात तसेच इतर राज्य मिळून जवळपास 400 मानसोपचार तज्ज्ञ या मोहिमेत सक्रिय काम करणार आहेत. तर इतर काही राज्यातील मनोविकारतज्ज्ञही यातून प्रेरणा घेऊन त्यांच्या भागांमध्ये हा प्रयत्न करणार आहेत. महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला कार्यक्रम लवकरच देशभरात सर्वत्र राबवण्यात येईल, ही महाराष्ट्रासाठी नक्कीच गर्वाची बाब असणार आहे.
लोकांमध्ये विशेषतः तरूणांमध्ये व्यसनाधीनतेविषयी गैरसमज दूर करणे, त्यांना व्यसनांपासून दूर राहण्यास मदत करणे, व्यसन हाही एक मानसिक आजार आहे, त्याकरिता प्रतिबंधक उपाय आहेत आणि शास्त्रीय उपचार उपलब्ध आहे, याविषयी जनजागृती करणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे. ज्यामुळे सशक्त व्यसनमुक्त तरूणाई तयार होण्यास मदत होऊन देशाच्या विकासाला हातभार लागेल.   गाव तेथे मानसोपचार या राज्यव्यापी अभियानाचा एक अविभाज्य भाग असलेले आपल्या रत्नागिरी परिसरातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कृष्णा पेवेकर, डॉ. अतुल ढगे व डॉ. मृण्मयी पेवेकर तरूणांना महाविद्यालये, शाळा येथे प्रत्यक्ष होणार्‍या चर्चासत्रात मार्गदर्शन करणार आहेत. 26 जून ते 31 जुलै दरम्यान आपल्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये हा कार्यक्रम आयोजित करावयाचा असल्यास आपल्या जवळच्या मनोविकातज्ज्ञांशी किंवा 9503421124 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन डॉ. अतुल ढगे यांनी केले आहे. तसेच या संवेदनाशील आणि महत्त्वाच्या उपक्रमात सर्वांनी आपला हातभार लावावा, हे आवाहन राज्यभरातील मानसोपचार तज्ज्ञांनी केले आहे.
 याबाबत डॉ. अतुल ढगे म्हणतात, कुमारवयातील मुलांमध्ये व तरूणांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढत चालले आहे. आधीच व्यसनांबाबत त्याच्या परिणामाबद्धल त्यांना पूर्ण माहिती असेल तर ते हे प्रयोग करणार नाहीत. आपले मूल व्यसन करते आहे, हे लक्षात आल्यावर लगेचच मनोविकारतज्ज्ञाची मदत घेतल्यास हा आजार लगेचच काबूत आणता येऊ शकतो. कारण वेळ घालवल्यास या आजारावर उपचार करण्यास अवघड जाऊ शकते.
डॉ. कृष्णा पेवेकर म्हणतात, अमली पदार्थ काही निमित्ताने व्यक्तींच्या आयुष्यात शिरकाव करतात. या व्यक्ती त्यांच्या आहारी जाऊन कधी उद्ध्वस्त होतात हे त्यांचे त्यांनाच कळत नाही. बरं याचा तो एकटाच बळी पडतो असं नाही तर सगळ्या कुटुंबाची वाताहात होते. या व्यसनांसंदर्भात बरीच गुंतागुंती असली तरी एक सहजसाध्य गोष्ट म्हणजे व्यसनमुक्तीसाठीचा प्रयत्न.
डॉ. मृण्मई पेवेकर म्हणातात की, व्यसनाधीनतेचा विळख्यात युवा तरूण, वृद्ध अशी बरीच जणं अडकतात. व्यसनाधिनता हा एक फक्त मानसिक आजार नसून ती सामाजिक, घरगुती, व्यावसायिक व राष्ट्रीय समस्याही आहे. व्यसनांमुळे गरिबी, घरगुती समस्या व हिंसाचारात वाढ होते. व्यक्तीला व त्याच्या घरच्यांना आर्थिक समस्यांचा सामना करायला लागतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button