जिल्हा बँक गरीब विद्यार्थ्यांवर खर्च करणार : अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे
रत्नागिरी : जिल्ह्यात अनेक गरीब विद्यार्थ्यांना नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेताना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. जिल्हा बँकेने यंदा 44 लाख रुपयांचा आकस्मिक निधी शिल्लक ठेवला आहे. त्यातील 22 लाख रुपये गरीब विद्यार्थ्यांच्या अर्थसहाय्यावर खर्च करण्यात येणार असल्याचे डॉ. चोरगे यांनी सांगितले. सभासदांना 12 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला असून ग्राहकांनी जास्तीतजास्त ठेवी या राष्ट्रीयकृत बँकेत न जाता जिल्हा बँकेकडे जमा कराव्यात असे आवाहन त्यांनी केले. येथील साई मंगल कार्यालयात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी संपन्न झाली.
या सभेला मार्गदर्शन करताना डॉ. चोरगे यांनी कर्ज वितरणाचे प्रमाण कमी झाल्याने चिंता व्यक्त केली. विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांनी जिल्हा बँकेच्या लाभांशावर अवलंबून न राहता त्या अधिक सक्षम कराव्यात, असे आवाहन डॉ. चोरगे यांनी केले. जिल्हा बँकेला गतवर्षी 47 कोटी रुपयांचा नफा झाला होता. यंदा 43 कोटी रुपयांचा नफा झाला असून 170 कोटी रुपयांचे कर्जवाटप कमी झाले आहे. सोसायट्यांमधील आर्थिक अनियमितता ही चिंतेची बाब आहे. चेअरमननी कोणावरही विश्वास ठेवून कागदांकडे न पाहता सह्या करू नयेत. सर्व कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर त्यावर स्वाक्षरी करावी. जिल्हा बँकेच्या नफ्यातून अपहारासंदर्भातील रकमेची तरतूद करावी लागत असल्याचे डॉ. चोरगे यांनी सांगितले. एक हजार रुपयांपेक्षा कमी रकमेची शेतकर्यांची कर्जमाफी जिल्हा बँक करणार असून त्यासाठी 6 लाख 6 हजार रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे डॉ. चोरगे यांनी सांगितले.
जिल्हा बँकेच्या माळनाका शाखेतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी चार वर्षे न्यायालयात खटला सुरू आहे. पाली शाखेतील गैरव्यवहार संदर्भात 30 वर्षे न्यायालयात खटला सुरू आहे. आर्थिक अनियमितता संदर्भात न्यायालयात जास्त काळ खटला सुरू राहणे जिल्हा बँकेसाठी अधिक त्रासदायक असल्याचे डॉ.चोरगे यांनी सांगितले.
यावेळी कार्यकारी संचालक अजय चव्हाण यांनी प्रास्ताविकासह वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठरावांचे वाचन केले. उपस्थित मान्यवरांनी विषयपत्रिकेवरील सर्व ठराव एकमताने मंजूर केले. कोरोनासह सहकार वर्षात मृत झालेल्या सर्वांना जिल्हा बँकेमार्फत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.