रघुवीर घाटातील दरड हटवली; वाहतूक सुरळीत
खेड : तालुक्यातील रघुवीर घाटात रविवारी दि. ८ रोजी सकाळी कोसळलेली दरड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या मदतीने सोमवार दि. ८ रोजी दुपारी तीन वाजता हटकून वाहतूक सुरळीत सुरू केली. मात्र घाटातून खासगी वाहनाने कांदाटी खोऱ्यातील नागरिकांनी ये-जा करताना सावधानता बाळगा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात येणार्या कांदाटी खोर्यातील सुमारे वीस गावांना भौगोलिकदृष्ट्या खेड तालुक्याला
जोडणाऱ्या रघुवीर घाटात रविवारी दरड कोसळली होती. मात्र दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही दरड बाजूला करणे बांधकाम विभागाला शक्य झाले नव्हते. सोमवारी दरड हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यावर्षी तिसर्या वेळी या घाटात दरड कोसळली असून हा धोका लक्षात घेता प्रशासनाने पर्यटनासाठी हा घाट १ जुलै पासूनच बंद केला आहे. कांदाटी खोर्यातील शिंदी, वळवण, उचाट, मोरणी, म्हाळुंगे, सालोशी, खांदाट, वाघावळे, लामज, निवळी, परबत, बन, चकदेव, आकल्पेसह अन्य गावांकडे जाण्याचा हा एकमेव मार्ग असल्याने या गावातील ग्रामस्थांना हा घाट दळणवळणासाठी सुरू ठेवण्यात आला आहे.