
रत्नागिरीत ‘चित्पावन’तर्फे 29 पासून श्रावण कीर्तन सप्ताह
रत्नागिरी : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे श्रावण कीर्तन सप्ताहाचे आयोजन केले आहे. येत्या शुक्रवारपासून (दि.29) ते 4 ऑगस्टपर्यंत मंडळाच्या जोशी पाळंद येथील ल. वि. केळकर वसतिगृहाच्या श्री भगवान परशुराम सभागृहात सायंकाळी 5 ते 7 या वेळेत सप्ताह होईल. सप्ताहाचे हे 11 वे वर्ष आहे. यात पनवेल, पुणे, गोवा, संगमेश्वर, अलिबाग येथील नामवंत कीर्तनकार या सप्ताहात कीर्तनसेवा रुजू करणार आहेत.
29 जुलैला पहिले पुष्प रंगवणार आहेत पनवेलचे ज्येष्ठ कीर्तनकार हभप अनंत उर्फ नंदकुमार कर्वे. चित्रसेन गंधर्व (कृष्णार्जुन युद्ध) यावर ते कीर्तन करतील. 1984 पासून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, गोवा, कर्नाटक या ठिकाणी त्यांचे कीर्तने झाली आहेत. 30 जुलै रोजी पुण्याचे ज्येष्ठ कीर्तनकार हभप उद्धवबुवा जावडेकर हे नागिण या आख्यान विषयावर कीर्तन रंगवतील. गेल्या 40 वर्षांत त्यांनी सुमारे 6500 कीर्तने ठिकठिकाणी केली. 31 जुलै रोजी गोव्याचे ज्येष्ठ कीर्तनकार हभप केशव माधव शिवडेकर हे स्थालीहरण हा आख्यान विषयावर कीर्तन सादर करणार आहेत. 1 ऑगस्ट रोजी पुण्याच्या हभप डॉ. प्रज्ञा देशपांडे- पळसोदकर या लोकमान्य टिळक आख्यान विषयावर कीर्तन सादर करतील. कीर्तनाख्यानातील सांगितिक आयामांचा चिकीत्सक अभ्यास या विषयातील संशोधन कार्याबद्दल त्यांना विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी मिळाली आहे.
2 ऑगस्ट रोजी रेवदंडा-अलिबाग येथील हभप संदीप केळकर हे आख्यानविषय कीचकवध यावर कीर्तन सादर करतील. गेली 35 वर्षे महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आदी राज्यांत व परदेशात ओमान येथे एकूण तीन हजार हून अधिक कीर्तने सादर केली आहेत. 3 ऑगस्टला पुण्याच्या हभप सौ. स्मिता आजेगावकर या श्री समर्थ रामदास स्वामी या आख्यान विषयावर कीर्तन रंगवतील. 25 वर्षांत महाराष्ट्रासह अन्य राज्यांत त्यांनी कीर्तने केली आहेत. 4 ऑगस्टला सांगतेचे कीर्तन हभप श्रीनिवास पेंडसे हे पृथ्वीराज चौहान या आख्यानविषयावर सादर करणार आहेत. धामणी, संगमेश्वर येथे श्रीनिवास पेंडसे हे कीर्तनकार आणि प्रवचनकार असून त्यांची अनेक कीर्तने, व्याख्याने ऐतिहासिक विषयांवर असतात.
या कीर्तन सप्ताहाचा आस्वाद सर्व कीर्तनप्रेमी, रसिकांनी घ्यावा, असे आवाहन अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळाने केले आहे.