
महा ई सेवा केंद्रांमध्ये दरफलक लावण्याची ठाकूर यांची मागणी
गुहागर : तालुक्यातील महा- ई-सेवा केंद्राकडून नागरिकांची लेखी स्वरूपातील कामे केली जातात. पण त्यासाठी आकारण्यात येणारा मोबदला मात्र सगळीकडे सारखा नसून तो प्रत्येक ठिकाणी कमी-जास्त प्रमाणात असल्याचे आढळते. असे न होता सर्व ठिकाणी कामाप्रमाणे मोबदलाही सारखाच असावा व तसा दरफलक त्या कार्यालयाबाहेर लावण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे गुहागर तालुका अध्यक्ष रियाज ठाकूर यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
सेतू कार्यालयातील दर वेगवेगळे तर महा-ई-सेवा केंद्रामधील दरांमध्येही समानता दिसून येत नाही. सर्व ठिकाणी समान दर असावेत व तसे दर फलक त्यांच्या कार्यालयासमोर लावावेत तसेच विविध दाखल्यांचे दरही त्या फलकावर लिहिलेले असावेत, अशी मागणी रियाज ठाकूर यांनी यापूर्वीही केली होती. परंतु आजपर्यंत कसल्याही प्रकारची कार्यवाही झाली नसल्यामुळे ठाकूर यांनी त्या संदर्भात नुकतेच स्मरणपत्र दिले आहे. 15 ऑगस्टपर्यंत कार्यवाही न झाल्यास उपोषणासारखा पवित्रा घेऊ. जनतेची होणारी पिळवणूक ही थांबलीच पाहिजे, असा इशारा दिला आहे.