रत्नागिरी जिल्हा परिषदेने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून बनवले हुशार
रत्नागिरी : स्पर्धा परीक्षांच्याबाबत रत्नागिरी जिल्हा परिषदेने नवा आदर्श निर्माण केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून जि.प. प्रशासनातर्फे विविध उपक्रम राबवून मुलांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून हुशार बनवले आहे. गुणवत्ता कक्षाच्या माध्यमातून शिष्यवृत्ती परीक्षेनंतर आता नवोदयच्या परीक्षेत जि. प. शाळेतील मुलांचे यश लक्षवेधी ठरले आहे. शिष्यवृत्ती यादीत 110 तर नवोदयच्या यादीत 48 विद्यार्थी चमकले आहेत.
आजच्या युगामध्ये स्पर्धा परीक्षांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यासाठी विद्यार्थी व शिक्षक स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात पारंगत असणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये स्पर्धा परीक्षेविषयी सखोल ज्ञान देण्यासाठी दोन वर्षांपूर्वी गुणवत्ता कक्ष स्थापन करण्याचा निर्णय जि. प. प्रशासनाने घेतला होता. एकाच वेळी अनेक उपक्रम न राबवता यामध्ये स्पर्धा परीक्षा हेच लक्ष्य ठेवून हा उपक्रम राबवण्यात येत
आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकवून ठेवून व त्यामध्ये वाढ करण्यासाठी दरवर्षी शासनामार्फत व जिल्हा परिषद रत्नागिरीमार्फत विविध उपक्रम राबविले जातात. मात्र, एकच लक्ष्य ठेवून उपक्रम न राबविला गेल्यामुळे परिणामकारक अंमलबजावणी होत नाही. म्हणून शैक्षणिक गुणवत्ता वाढ व शिष्यवृत्तीसहीत सर्व स्पर्धा परीक्षा यासाठी एक स्वतंत्र कक्ष स्थापन करून या उपक्रमामध्ये जिल्हा परिषद शाळांचे स्थान उंचावणे हेच मुख्य लक्ष ठेवण्यात आले आहे.
जागतिक स्पर्धेत टिकून राहतील असे विद्यार्थी बनवणे, स्पर्धा परीक्षांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी तयार करणे, स्पर्धा परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रभुत्व निर्माण करणे, जि.प.च्या शाळेमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकवून ठेवणे, प्रत्येक विद्यार्थ्याला खात्रीपूर्वक व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, आवश्यक असणारे वर्गनिहाय शैक्षणिक साहित्य उपलब्ध करणे, प्रत्येक आठवड्याला एक सराव पेपर घेणे, असे उद्देश या उपक्रमाचे आहेत. सध्या या गुणवत्ता कक्षासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, शिक्षण अधिकारी वामन जगदाळे, उपशिक्षणाधिकारी एस. जे. मुरकुटे, संदेश कडव यांचे मार्गदर्शन लाभले.
या गुणवत्ता कक्षाचा परिणाम आता दिसू लागला आहे. शिष्यवृत्ती तसेच नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत जि.प.च्या शाळांमध्ये मुलं झळकू लागली आहेत. यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत 110 मुलं यादीत झळकली आहेत. गतवर्षी ही संख्या 56 होती. नवोदय विद्यालयासाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. परजिल्ह्यातील तसेच खासगी शाळेतील मुलांची संख्या या शाळेत जास्त होती. यामुळे जिल्हा परिषदेच्या विविध बैठकांमध्ये हा विषय वारंवार येत होता. हा विषय वादाचाही ठरला होता. यावर्षी याबाबत शिक्षण विभाग तसेच मुख्य कार्यकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी स्वत: लक्ष घातले होता. 80 विद्यार्थ्यांपैकी 48 विद्यार्थी हे जिल्हा परिषदेच्या शाळेतील आले आहेत. दोन वर्षांपूर्वी हे प्रमाण फक्त 9 होते.