रत्नागिरीतील शिवसेनेच्या मेळाव्यानंतर आजच्या चिपळुणातील मेळाव्याकडे जिल्ह्याचे लक्ष
चिपळूण : रत्नागिरी येथील शिवसेनेच्या मेळाव्यानंतर आता चिपळुणातील मेळाव्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. कापसाळ येथील माटे सभागृहात सोमवार दि. 11 रोजी चिपळूण तालुका शिवसेनेच्या कार्यकर्ता, पदाधिकार्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यासह विद्यमान खा. विनायक राऊत, माजी मंत्री व आ. भास्कर जाधव, माजी आ. सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम आदी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, हा मेळावा म्हणजे निष्ठावान शिवसैनिकांची सत्त्वपरीक्षा ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे. राज्यातील सत्तांतरानंतर सत्तेतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेंतर्गत आमदार व मंत्र्यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. सरकार कोसळण्यापेक्षा बंडखोरीचा सर्वात जास्त फटका शिवसेनेला बसला. गेले काही दिवस सत्तांतरानंतर संघटना अंतर्गत वातावरण ढवळून निघत आहे. एकूणच संघटनेतील सामान्य कार्यकर्त्यांमध्ये शिवसेना अंतर्गत राजकीय पेचप्रसंगामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.