वादळी वाऱ्याने आंब्याच्या झाडासह विजवाहिनी कोसळली…दैव बलवत्तर म्हणून ते बचावले… पुतण्याच्या प्रसंगावधानामुळे काकाचे प्राण वाचले
राजापूर : शेतात नांगरणीचे काम करत असताना वादळी वार्यामुळे आंब्याच्या झाडासह वीजवाहिनी कोसळून चुनाकोळवण सुतारवाडी येथील अनाजी मिरजोळकर हे जखमी झाले आहेत. मात्र, पुतण्याने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे ते बचावले.
मिरजोळकर हे रविवारी आपल्या घराजवळील शेतामध्ये नांगरणीचे काम करत होते. अचानक आलेल्या वादळी वार्यामुळे त्यांच्या शेताजवळून जाणार्या वीज वाहिनीवर झाड पडून तारा शेतात पडल्याने त्यांना शॉक लागला. पडलेल्या तारांमध्ये विद्युतप्रवाह चालू होता. परंतु, त्यांच्या पुतण्याने प्रसंगावधान राखून हातातील कोयते तारांवर फेकून मारल्याने त्या तारा तुटल्या व सुक्या बांबूने त्या बाजूला केल्याने मोठा अनर्थ टळला.
आंब्याचे झाड त्यांच्या खांद्यावर पडल्याने ते जखमी होऊन बेशुद्ध पडले. त्यांच्या खांद्याला मार लागला. तत्काळ त्यांना ओणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार करून रात्री उशिरा त्यांना घरी सोडण्यात आले. त्यांची प्रकृती सुधारत आहे. केवळ पुतण्याने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मिरजोळकर हे बचावले आहेत. मिरजोळकर यांच्याबरोबर शेतात काम करत असलेल्या तीन महिला व तीन पुरुष यांनाही शॉक लागला. या घटनेनंतर राजापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.