अतिक्रमण केल्याप्रकरणी टाळसुरे येथे गुन्हा दाखल
दापोली : अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमानुसार बेकायदा अतिक्रमण केल्याप्रकरणी टाळसुरे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भास्कर भोसले (वय ४९) हे फासेपारधी समाजाचे आहेत. त्यांनी टाळसुरे येथे 1993 मध्ये स्मिता विचारे यांच्याकडून जागा खरेदी केली होती. या जागेत सुनील दांगट व प्रमोद रहाटे यांनी त्यांच्या जागेत अतिक्रमण केलेले आहे. अशी तक्रार भास्कर भोसले यांनी दापोली पोलिस स्थानकात दाखल केली आहे. भोसले हे पुणे येथे राहण्यास असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीचा गैरफायदा घेऊन दांगट आणि रहाटे यांनी ती जागा स्वतःच्या ताब्यात घेतली आहे. तसेच जागेत बांधलेले कुंपण तोडून नुकसान केले असल्याचे भोसले यांनी फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. या फिर्यादीनुसार अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 सुधारित सन 2015 चे कलम 3(1) (फ) (जी) भादवि कलम 447, 427 ,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी काशीद हे करीत आहेत.