पालशेतमध्ये साडीच्या झोपाळ्यावर खेळताना फास लागून बालकाचा मृत्यू
गुहागर : गुहागर तालुक्यातील पालशेत बाजारपेठ सावरकर पेठ येथे 15 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. साडीच्या झोपाळ्यात खेळताना फास लागून बालकाचा मृत्यू झाला. निहाल सुभाष जाक्कर असे या मुलाचे नाव आहे. तो इयत्ता 8 वी मध्ये शिकत होता.
याबाबत जितेंद्र दत्ताराम वायंगणकर (वय 36) यांनी गुहागर पोलिस ठाणे येथे माहिती दिली. जितेंद्र वायंगणकर हे पालशेत बाजारपेठेत राहतात. महिनाभरापूर्वी घरातील मुलांना खेळण्यासाठी घराच्या माळ्यावर जितेंद्र वायंगणकर यांनी नायलॉनच्या साडीचा झोपाळा बांधलेला होता. या झोपाळ्यावर ही मुले खेळायची. शुक्रवारी दि. 17 रोजी जितेंद्र वायंगणकर रात्री नऊ वाजता बेकरीतील काम आटपून घरी आले. त्यानंतर ते घराच्या माळ्यावर गेले. तिथे त्यांच्या आतेभावाचा मुलगा निहाल हा नायलॉन साडीच्या झोपाळ्यात अडकलेला त्यांना दिसला. निहालच्या मानेला साडीचे वेटोळे होते. तर निहालचे पाय लोंबकळत होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. शुक्रवारी 17 रोजी रात्री 8 ते 9 च्या दरम्यान निहाल एकटाच माळ्यावर खेळायला गेला होता. याच दरम्यान साडीच्या झोपाळ्यात मान अडकून त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. या घटनेचा अधिक तपास गुहागरचे प्रभारी पोलिस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.