सुकोंडीचा तलाठी 7 हजारांची लाच घेताना रंगेहाथ

दापोली : तालुक्यातील सुकोंडी सजाचा तलाठी अक्षय शिवगोंडा पाटील यांना 7  हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने दापोली न. पं. समोर रस्त्यावर रंगेहाथ पकडले. ही कारवाई दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे. वडिलोपार्जित जमीन नावावर करून देण्यासाठी ही लाच मागितली होती.
या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून प्राप्त माहितीनुसार यातील तक्रारदार यांच्या वडिलांनी मौजे सुकोंडी येथील जमीन तक्रारदार यांच्या नावावर करण्याबाबत मृत्यूपत्र केले होते. ही जमीन मृत्यूपश्‍चात तक्रारदार यांच्या नावावर होण्यासाठी तक्रारदार यांनी तलाठी सुकोंडी यांच्याकडे अर्ज केला होता.
ही जमीन त्यांच्या नावावर करून तसा 7/12 उतारा देण्याकरिता सुकोंडी सजाचे तलाठी अक्षय पाटील यांनी तक्रारदारांकडे दहा हजार रुपये लाच मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी लोकसेवक असलेल्या अक्षय पाटील यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांच्याकडे तक्रार केली होती. या अनुषंगाने दि. 21 सप्टेंबर 2022 रोजी उतारा देण्यासाठी 7 हजार रुपयांची मागणी केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले. जमीन तक्रारदार यांच्या नावावर करून जमिनीचा 7/12 सातबारा उतारा देण्याकरिता तलाठी अक्षय पाटील यांनी तडजोडीअंती सात हजार रुपये लाच रक्कम तक्रारदार यांच्याकडून बुधवार दि. 21 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 2 च्या सुमारास दापोली नगर पंचायत कार्यालयासमोरील रोडवर पंचांसमक्ष स्वीकारल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक अनिल घेरडीकर, पोलिस उपाधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनंत कांबळे, पोलिस हवालदार संतोष कोळेकर, पोलिस शिपाई हेमंत पवार, राजेश गावकर व चालक पोलिस नाईक प्रशांत कांबळे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button