गुरुजी, माझ्या मुलाला पहिलीतच ठेवा! कोरोनाकाळात शैक्षणिक नुकसान झाल्यामुळे पालक हतबल
रत्नागिरी : कोरोना काळात २०२० मध्ये इयत्ता पहिली प्रवेश झालेल्या चिमुकल्यांना शाळा कशाला म्हणतात ते कळलंच नाही. पुढच्या वर्षी हेच विद्यार्थी दुसरीत गेले. हा काळही कोरोनाच्या संकटकाळात गेला. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासात कच्चे राहिले. त्यामुळे माझ्या मुलाला पुन्हा पहिलीतच ठेवा गुरुजी, अशी विनवणी काही पालक करत आहेत. कोरोनाकाळात सर्वात जास्त शैक्षणिक नुकसान झाले, ते न भरून येणारे आहे. मुलांना शाळेची सवयच मोडली आणि ऑनलाईन शिक्षण प्रणालीत म्हणावे, असे प्रभावी शिक्षण विद्यार्थ्यांचे झाले नाही. तर ग्रामीण भागात मोबाईलला रेंजच नसल्याने ऑनलाइन शिक्षण उपयुक्त ठरले नाही. तर ज्या विद्यार्थ्यांनी शाळेचे तोंडच पाहिले नाही. ते विद्यार्थी आता पहिलीतून दुसरीत गेले. तर दुसरीचे तिसरीत गेले म्हणून पालक आता शाळा सुरू होताच गुरूजींना म्हणू लागले. काही करा पण माझ्या मुलाला पहिलीतच ठेवा. असे असले तरी शिक्षण विभागाच्या पोर्टलवर नावनोंदणी पद्धतीमुळे तसे करता येत नाही, असे उत्तर त्यांना शिक्षकांकडून मिळत आहे.