
एसटी संप मिटताच उभी राहिली १९० गाड्यांच्या पासिंगची समस्या
रत्नागिरी : गेल्या चार महिन्यांहून अधिक कालावधी राज्यात एसटी कर्मचार्यांचा संप सुरु होता. त्यामुळे एसटीचे यावर्षीचे पासिंग वेळेत झालेले नाहीत. पासिंग गतीने करुन घेण्याचे काम एसटी विभागाने आरटीओ यांच्या सहकार्याने सुरु केले आहे. तरीदेखील अद्याप 190 एसटीचे पासिंग होणे शिल्लक असल्याची माहिती रत्नागिरी एसटी प्रशासनाने दिली.
आगारातील एसटीचे दरवर्षी पासिंग करावे लागते, कोरोना काळातही वेळेवर पासिंग करुन घेण्यात आले होते. मात्र, यंदा संपाच्या दिरंगाईमुळे पासिंग कामात अडचणी आल्या. कारण जवळपास 80 टक्के कर्मचारी संपात सहभागी होते. या गाड्या पासिंगसाठी चालकच घेऊन जातात. गाड्या नेण्यासाठी चालकच नव्हते. आता पासिंगचे काम सुरु करण्यात आले आहे.
गाड्यांचे पासिंग वेळेत झाले नाही म्हणून वेळापत्रकात व्यत्यय येऊ शकतो त्यामुळे यामध्ये कोणत्याही अडचणी येवू नये यासाठी आरटीओकडून सहकार्य मिळत असल्याचे सांगण्यात आले.