‘लोटिस्मा’त सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते शि. म. परांजपे यांच्या तैलचित्राचे अनावरण

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात पूर्व लोकसभाध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते ‘काळकर्ते’ शि. म. परांजपे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी कान्होजीराजे आंग्रे यांचे नववे वंशज श्रीमंत रघूजीराजे आंग्रे, मिलिंद साठे, प्रकाश देशपांडे, वाचनालयाचे संचालक आणि हितचिंतक उपस्थित होते. कोकणातील महाड येथे जन्मलेले शिवराम महादेव परांजपे (१८६४-१९२९) हे मराठी पत्रकार, निबंधकार, लेखक होते. तत्कालीन ब्रिटिश भारतातील ब्रिटिश शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध ‘काळ’ या मराठी साप्ताहिकातून त्यांनी केलेली टीकात्मक पत्रकारिता मराठी पत्रकारितेच्या इतिहासातील मानदंड समजली जाते. मॅट्रिकच्या परीक्षेतील संस्कृत भाषेसाठीच्या जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्तीचे ते पहिले मानकरी होते. १८९८ साली त्यांनी ‘काळ’ हे वृत्तपत्र सुरू केले होते. त्यांनी आपल्या पत्राची जाहिरात ‘धार्मिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक आणि वाङ्मयीन विषयांची नि:ष्पक्षपातीपणे व निर्भयपणे पूर्ण चर्चा करणारे वृत्तपत्र’ अशा शब्दांमध्ये केली होती. ते ‘काळकर्ते’ परांजपे म्हणून ओळखले जात. त्यांच्या लिखाणात देशाभिमान, पांडित्य व रसिकता यांचे मिश्रण होते. वक्रोक्ती व व्याजोक्ती ही त्यांच्या लिखाणाची प्रमुख वैशिष्ट्ये मानली जातात. ते प्रभावी वक्ते होते. आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये राष्ट्रभक्ती, स्वातंत्र्य या मूल्यांचा प्रचार केला. ‘काळ’मधील लिखाणासाठी भारतातील इंग्रज सरकारने त्यांना अटक केल्यावर वर्षभराने १९०९ साली ‘काळ’ बंद पडला. १९२० साली त्यांनी ‘स्वराज्य’ हे साप्ताहिक काढले. १९२९ साली बेळगावात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button