
कल्याण टोलवेज या कंपनीच्या हलगर्जीपणामुळे भरणे येथे उड्डाणपुलाला लावलेले लोखंडी टेकू नजीकच्या सर्व्हीस रोडवर कोसळले
गोवा राष्ट्रीय महामार्ग खेड तालुक्यात चौपदरीकरण कामाचा ठेका असलेल्या कल्याण टोलवेज या कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शनिवारी सकाळी भरणे येथे उड्डाणपुलाला लावलेले लोखंडी टेकू नजीकच्या सर्व्हीस रोडवर कोसळले.सुदैवाने यावेळी मार्गावर वाहने व पादचारी नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातानंतर भरणे ग्रामस्थ संतप्त झाले असून या अक्षम्य हलगर्जीपणाबद्दल कल्याण टोलवेज कंपनी विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
चौपदरी उड्डाण पुलाला खालून दिलेले लोखंडी टेकू काढण्याचे काम कल्याण टोलवेज कंपनीकडून सुरू होते. मात्र, यावेळी कोणतीही खबरदारी न घेता काम सुरू असल्याने अचानक मोठा आवाज करत काही टन वजन असलेले लोखंडी बीम सर्व्हिस रोडवर कोसळले. हा सर्विसरोड मुंबईहून खेड, दापोलीच्या दिशेने वाहनांना ये-जा करण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे या रस्त्यावर वाहने व पादचारी यांची सतत रहदारी असते.
सुदैवाने अपघात घडला, त्यावेळी वाहने व पादचाऱ्यांची रहदारी कमी होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
www.konkantoday.com