लांजा, राजापुरात पाऊस; जिल्ह्यात येलो अॅलर्ट
रत्नागिरी : राजापूर व लांजात गुरुवारी दुपारी 3 वाजल्यानंतर पंधरा मिनिटे जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील इतर तालुक्यात वातावरण ढगाळ होते. अवकाळी पावसाने व ढगाळ वातावरणाने आंबा, काजू बागांचे नुकसान झाले आहे. लांजा तालुक्यातील केळंबे, विवली, खेरवसे, बेनी खुर्द, शिपोशी, कोचरी, सालपे, पालू, केळवली, माचाळ येथे हा पाऊस पडला. बहरात असलेल्या या फळझाडांना काही अंशी नुकसान पोहोचले आहे. कुलाबा वेधशाळेने दिलेल्या हवामान संदेशानुसार दक्षिणपूर्व अरबी समुद्रामध्ये केरळच्या किनार्यापासून तर थेट कोकण किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे पूर्व आणि पश्चिमी वारे संयुक्तपणे कार्यरत झाले आहेत. त्याच्या प्रभावाने कोकण किनारपट्टी भागात धुळीच्या वादळासह काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागात येलो अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.