आंबा व काजू बागायतदार शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळावी -शौकतभाई मुकादम यांची मागणी
चिपळूण तालुक्यातील आंबा व काजू बागायतदारांना बदलत्या हवामानाचा फटका बसल्याने त्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते व माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी केली आहे. लहरी हवामानामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. ऐन भात शेतीच्या हंगामात पावसामुळे भाताचे पीक हातचे गेले व मोठे नुकसान झाले सततच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास वाया गेला असताना आता आंबा व काजू पिकातून याची काहीअंशी भरपाई होईल अशी अपेक्षा होती परंतु ती फोल ठरली आहे.
यावर्षी आंबा व काजूला मोहोर येण्याच्या हंगामात थंडी पडली, मोहोरही चांगला आला परंतु वातावरणात झालेल्या बदलामुळे मध्येच दव पडला शिवाय उन्हाची तीव्रताही वाढल्याने आलेला मोहोर काळवंडून सुकून केला. त्यामुळे फळधारणा होण्यात अडथळे आले, हे पिकही हातचे जाणार असल्याने शेतकरी, बागायतदारांचे नुकसान होणार आहे. तरी शासनाने याचा सारासार विचार करून शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मुकादम यांनी केली आहे. www.konkantoday.com