
चिखलदरा येथे तयार होणारा प्रस्तावित स्कायवॉक 407 मीटरचा म्हणजेच हिंदुस्थानातील पहिला आणि जगातील सर्वात लांब स्कायवॉक ठरणार
अमरावतीतील चिखलदरा या पर्यटनस्थळाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या स्कायवॉकचे काम केंद्रीय वन विभागाच्या परवानगीअभावी मागील सहा महिने थांबले होते. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केल्याने अखेर या स्कायवॉकला केंद्रातील मोदी सरकारची परवानगी मिळाली आहे.
दोन दऱ्यांना जोडणारा 407 मीटरचा हा स्कायवॉक जगातील सर्वात मोठा काचेचा स्कायवॉक ठरणार असून या परवानगीबद्दल पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
चिखलदरा या पर्यटनस्थळाची ‘विदर्भाचे कश्मीर’ म्हणून ओळख आहे. चिखलदरातील गोराघाट पॉइंटपासून ते हरीकेन पॉइंटपर्यंत सुमारे 407 मीटरच्या या प्रकल्पाला 2018 सालीच राज्य सरकारने परवानगी दिली. यासाठी 34.34 कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र काम सुरू असतानाच केंद्र सरकारच्या वन विभागाने लावलेल्या नियमाच्या पट्टीमुळे सहा महिने हे काम रखडले होते. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यात नुकतीच याबाबत बैठक झाली होती. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी केली. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आणि अवघ्या काही दिवसांतच या स्कायवॉकच्या मार्गातील अडथळे दूर झाले.
जगात स्वित्झर्लंड आणि चीन या ठिकाणी स्कायवॉक आहे . स्वित्झर्लंडचा स्कायवॉक 397 मीटर , तर चीनचा स्कायवॉक 360 मीटरचा आहे . मात्र अमरावती जिह्यातील चिखलदरा येथे तयार होणारा प्रस्तावित स्कायवॉक 407 मीटरचा म्हणजेच हिंदुस्थानातील पहिला आणि जगातील सर्वात लांब स्कायवॉक असणार आहे .
www.konkabtoday.com