दापोली हादरले : तीन वृद्ध महिलांचा जळून मृत्यू, घातपाताचा संशय

0
108

दापोली तालुक्यातील वणोशी खोतवाडी येथे एकाच घरातील तीन वृद्ध महिलांचा जळून मृत्यू झाल्याची घटना 14 जानेवारी शुक्रवार रोजी सकाळी समोर आली असून या घटनेने तालुका हादरून गेला आहे. घातपाताचा संशय व्यक्त केला जात असून दापोली पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार दापोली पालगड रोडवरील वणोशी या गावांमध्ये खोतवाडी आहे. या वाडीमध्ये सुमारे पस्तीस घरे आहेत. बहुतांशी घरे ही बंद अवस्थेत आहेत. येथील बहुतांश ग्रामस्थ हे कामाधंद्यानिमित्त मुंबई येथे स्थलांतरित झालेले आहेत. गावामध्ये केवळ चार ते पाच कुटुंबच वास्तव्याला आहेत. गावातील खोतवाडी येथे एका घरामध्ये सत्यवती पाटणे- वय 75, पार्वती पाटणे – वय 90 या वृद्ध महिला राहत होत्या. त्यांच्या समोरच्या घरात त्यांचेच नातेवाईक इंदुबाई पाटणे – वय 85 या राहायला होत्या. सध्या दापोलीत थंडी असल्याने त्या घराची दारं-खिडक्या बंद करून झोपल्या. या घरात दररोज पूजा करण्याकरिता विनायक पाटणे हे सकाळी यायचे. त्यांना शुक्रवारी सकाळी या महिला दिसल्या नाहीत. दरवाजा लोटून पाहिला असता या वृद्ध महिला मृत स्थितीत आढळून आल्या.
त्यांनी ही बाब ग्रामस्थांना सांगितली. ही बाब कळल्यानंतर मुंबईतील नातेवाईक दापोली येथे दाखल झाले. त्यानंतर पोलिस निरीक्षक नितीन ढेरे हे देखील आपल्या अधिकार्‍यांसमवेत शुक्रवारी सायंकाळी घटनास्थळी रवाना झाले. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. या महिला ज्या घरामध्ये मृतावस्थेत आढळून आल्या त्या घराचा पुढील दरवाजा बंद होता व मागील दरवाजा उघडा होता. सत्यवती पाटणे या पडवीमध्ये चुलीच्याजवळ मृतावस्थेत जळलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यांचे डोके फुटून त्यातून बरेच रक्त देखील वाहून गेल्याचे दिसून येत होते. शिवाय पार्वती पाटणे या अनेक वर्ष जागेवरच असल्याने त्या दुसर्‍या खोलीमध्ये जळलेल्या अवस्थेमध्ये आढळून आल्या. इंदुबाई पाटणे या त्यांच्या समोरच्या घरात राहणार्‍या त्यांच्या दुसर्‍या नातेवाईक होत्या. त्या या दोन महिलांच्या घरातील हॉलमध्ये मृतावस्थेत आढळून आल्या. या घराचा दरवाजा आतल्या बाजूने बंद होता, यामुळे संशय व्यक्त करण्यात येत आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here