पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रत्नागिरीतील आंबा प्रक्रियादार देवेंद्र झापडेकर यांच्याशी साधला संवाद

रत्नागिरी– पीएम किसान योजनेच्या नवव्या टप्प्याला आज प्रारंभ झाला. त्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या राज्यांतील शेतकर्‍यांशीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट संवाद साधला. त्यात रत्नागिरीतील आंबा उत्पादक देवेंद्र झापडेकर यांचाही समावेश होता.

सिव्हिल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा घेतलेल्या देवेंद्र झापडेकर यांनी आपल्या वडिलांचा शेतीचा व्यवसाय पुढे नेला. सरकारी योजनेंतर्गत मँगो रायपनिंग चेंबरसाठी बँक ऑफ इंडियाच्या रत्नागिरीतील मारुती मंदिर शाखेतून १६ लाख रुपयांचे कर्ज घेतले. दोन आठवड्यांमध्ये हे कर्ज मिळाले. कर्ज घेताना बॅंकेकडून कोणताही त्रास झाला नाही, असे झापडेकर पंतप्रधान मोदी यांना म्हणाले.

आंबा प्रक्रियादार झापडेकर यांना पंतप्रधान मोदी यांनी प्रश्‍न विचारत माहिती जाणून घेतली. आंबा उद्योगासाठी कुठून प्रेरणा मिळाली आणि पुढे यशस्वी कसे झाला, याची माहिती घेतली. नैसर्गिकरित्या आंबा पिकवण्यासाठी 14 ते 15 दिवस लागायचे आता रायपनिंग चेंबरमुळे ते 4 ते 5 दिवसात पिकतात. इंजिनिअरिंगकडून थेट प्रक्रियादार होताना घरचे नाराज होते का या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रश्नावर झापडेकर म्हणाले, माझी आई वारंवार शेतीकडे वळण्याचा सल्ला देत होती. त्यामुळे घरातून प्रोत्साहन मिळाले. कोरोना कालावधीत आंबा पिकवण्यासाठी रायपनिंग चेंबर फायदेशीर ठरले. कृषी विभाग, बँक ऑफ इंडियाकडून चांगले सहकार्य मिळत असल्याचे झापडेकर यांनी आवर्जून सांगितले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, शेतीमुळे तुमच्या आयुष्यात मोठा बदल झाला. या प्रकल्पामुळे तुमच्या कुटूंबाचेच नव्हे तर सहकारी शेतकर्‍यांचेही भले केले आहे. तुम्ही राबविलेल्या प्रकल्पामुळे अन्य शेतकर्‍यांपुढे आदर्श दिला आहे. सहा वर्षांपुर्वी गरीब शेतकर्‍यांना कर्ज मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागत होते. अनेक अडचणी येत होत्या. आता ती परिस्थिती बदलली आहे. शेतकर्‍यांच्या अडचणी कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

चर्चेनंतर सांगतेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतीकडे वळ, असे सांगणाऱ्या आई श्रीमती झापडेकर यांना प्रणाम सांगा, असे देवेंद्र झापडेकर यांना विनम्रपणे सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button