देवरुख -पांगरी मार्गे रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची समविचारीचे तालुकाध्यक्ष मनोहर गुरव यांची मागणी
देवरुखः देवरुख -पांगरी मार्ग जिल्हास्तरीय रत्नागिरीशी निगडीत आहे.या मार्गावरुन शेकडो वाहने जा – ये करतात.या मार्गावरील रस्त्याच्या कामी लाखो रुपये आजपर्यत खर्च झाले पण फलित काय ?असा सवाल महाराष्ट्र समविचारी मंचचे संगमेश्वर तालुकाध्यक्ष मनोहर गुरव यांनी निवेदनाआधारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केला आहे.
या निवेदनात, सदर काम निकृष्ट करण्यात आले असून रुंदीकरण नावाला दर्शविण्यात आले आहे.गेली दोन वर्षे सुरु असलेले हे काम धिम्या गतीने सुरु असून झालेल्या डांबरीकरणाचा दर्जा तपासणे जरुरीचे असून गेल्या दहा दिवसात पडलेल्या पावसाने हे डांबरीकरण उखडले असून एकूणच या कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे निदर्शनास आणण्यात आले आहे.
या मार्गावरुन विविध ठिकाणचे लोक मार्लेश्वर या तीर्थस्थानी जातात.नोकरी व्यवसाय निमित्ताने अनेकांना या मार्गावरुन प्रवास करावा लागतो.संबंधित अधिकारी,लोकप्रतिनिधींच्या ही बाब निदर्शनास यावी म्हणून अनेकांनी प्रयत्न केल्याचे कळते. तरीही परिस्थितीत बदल झालेला नाही ही बाब अक्षम्य बेपर्वाई असून या मार्गावर अपघात झाल्यावर प्रशासनाला जाग येणार काय ? असा प्रश्न जनतेत निर्माण झाल्याचे मनोहर गुरव यांनी म्हटले आहे.
आजूबाजूची मोठमोठी झाडे रस्त्यावर आली असून दरड कोसळण्याची भीती आहे.मार्गावरील क्रशरचे डंपर वाहतूक सुरु असल्याने सर्वत्र चिखल पसरलेला दिसत आहे.साईडपट्या भरलेल्या नाहीत.लॉकडाऊन काळात देखरेख नसल्याने हे काम थातूरमातूर पद्धतीने उरकण्यात येत असून शासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा झाल्याची चर्चा जनतेत सुरु असून, याकामाचा दर्जा आणि गुणवत्ता तपासणीची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे नागरिकांच्या वतीने धाव घेत असल्याचे नमूद करुन संबंधित ठेकेदार,आणि अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी करीत असल्याचे समविचारी तालुकाध्यक्ष मनोहर गुरव यांनी नमूद केले आहे.
www.konkantoday.com