कर्जाचे हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी राज्याकडे प्रस्ताव द्यावा भाजयुमाे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांची आग्रही मागणी

रत्नागिरी – कोरोनामुळे सध्या टाळेबंदी सुरू असून व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. परंतु दुसर्‍या बाजूने बँकांकडून घेतलेल्या कर्जांचे हप्ते थकल्याने बँकांकडून व्यापार्‍यांकडे तगादा लावला जात आहे. त्यामुळे हे हप्ते भरण्याकरिता सक्ती न करता जिल्ह्यातील कर्जदारांची माहिती घेऊन हप्त्यांना मुदतवाढ मिळावी, तसा प्रस्ताव रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे पाठवावा. तिथून हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा म्हणजे व्यापार्‍यांना दिलासा मिळेल, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी पत्रकारांना सांगितले की, बँकांचे हप्ते मागण्यासाठी व्यापार्‍यांकडे तगादा लावला जात आहे. यामुळे व्यापारी वर्गामध्ये कमालीची अशांतता आहे. महाराष्ट्रात 15 एप्रिलपासून टाळेबंदी सुरू आहे. सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने टाळेबंदी वाढवणे आवश्यक आहे. परंतु ठप्प असलेल्या उद्योगधंद्यांना चालना देता येत नसल्याने व्यापार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. व्यापार्‍यांनी कर्ज व हप्ते फेडण्यास विरोध केलेला नाही. सद्यस्थितीत त्यांचा सकारात्मक दृष्टीने विचार केला पाहिजे. अर्थचक्र सुरळित होण्यासाठी अजून काही वेळ लागणार आहे. बँकांनी व्यापार्‍यांवर हप्त्यांसाठी सक्ती न करता सुसंवाद ठेवावा आणि त्याला हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी. रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बॅंकांची बैठक घेऊन यावर ताेडगा काढावा, माहिती गाेळा करून तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवावा.
अनिकेत पटवर्धन पुढे म्हणाले, व्यापारी हा समाजातील मोठ्या प्रमाणावर कर भरणारा वर्ग आहे. त्यामुळे तो जगला तरच शासनाला कर मिळणार आहे. शासनाने व्यापार्‍यांच्या व्यथा समजून त्यांना सहकार्य करावे. शासनाने या सार्‍या गोष्टींचा विचार करून बँकांमार्फत राज्य सरकारने व्यापार्‍यांचा डाटा केंद्र सरकारकडे द्यावा. हप्ते भरण्यासाठी थोडी वाढीव मुदत द्यावी. थकीत कर्ज व्याज धरून पुन्हा कर्जांचे पुनर्गठण करून दिलासा द्यावा. किमान सहा महीने मुदतवाढ द्यावी. सहा महीने फक्त व्याज आकारणी करावी. टाळेबंदीमुळे व्यापार बंद आहे, तरीही राज्य शासनाने सांगितले आहे की, नोकरांचे पगार, किमान लाईटबिल, गाळा भाडे द्यावेच लागत आहे. या कारणांमुळे निदान बँकानी तरी व्यापारांचा विचार करुन दिलासा द्यावा.
कर्जांच्या हप्त्याला मुदतवाढ मिळण्यासाठी भाजपमार्फत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वतीने केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याचीही माहिती अनिकेत पटवर्धन यांनी दिली.
कोकणात विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजू व्यावसायिक यांनाही कर्जामध्ये सवलत देण्याची मागणीही अनिकेत पटवर्धन यांनी केली आहे. कारण सलग दोन वर्षे आलेली चक्रीवादळे, बदलते तापमान उत्पादन कमी व कोरोनामुळे मालाला योग्य दर मिळालेला नाही. त्यामुळे सवलत मिळावी.असे पटवर्धन यांनी मागणी केली आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button