
टोलनाक्यांवर पास दाखविला तरी टोल कापला गेल्याचा खेड शिवापूर नाक्यावर चाकरमान्यांना अनुभव
मुख्यमंत्र्यांनी मोठ्या जोशात दरवर्षीप्रमाणे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना टोलमाफी जाहीर केली. परंतू, गेल्या दोन दिवसांत अनेकांना टोलनाक्यांवर पास दाखविला तरी टोल कापला गेल्याचा अनुभव आला आहे.यामुळे लुबाडले जात असल्याची भावना अनेक गणेशभक्तांमध्ये आहे. एकही असा पासधारक नसेल, ज्याचा टोल कापला गेला नसेल, एवढ्या मोठ्या संख्येने पासधारकांची दोन दिवसांत फसवणूक झाली आहे.
जर टोल माफी घ्यायची असेल तर आरटीओ किंवा पोलिस, वाहतूक ठाण्यांत पास मिळविण्याची सोय करण्यात आली आहे. त्यातच सुटीच्या दिवशी म्हणजे शनिवारी, रविवारी आणि बुधवारी टोल माफी पाससाठी ड्युटी लावल्याने आरटीओचे अधिकारी वैतागले आहेत. पुण्यात आरटीओ अधिकारी ६.३० वाजेपर्यंत ड्युटी असताना पाच वाजण्यापूर्वीच सर्व बंद करून जाण्याची तयारी करत होता. त्यानंतर गेलेल्या गणेशभक्ताला त्याच्या नाराजीला सामोरे जावे लागल्याचा प्रकार घडला आहे.
असे असताना टोल नाक्यांवर मात्र लुटण्याचे धंदे सुरु होते. टोल नाक्यांवर गणेशभक्तांच्या पाससाठी वेगळया लेन ठेवण्यात आल्या होत्या. त्यावर फलकही लावण्यात आले होते. परंतू त्या लेनपुढे लोखंडी गेट लावण्यात आले होते. यामुळे पासधारकांना रोजच्या फास्टॅग लेनमधून जावे लागत होते. इथेही हे कर्मचारी ऑटो स्कॅन चालू ठेवून बाहेर बोलत उभे राहत होते. नेहमी ही यंत्रणा, गाडी थोडी पुढे घे… असे म्हणत मॅन्युअली टोल स्कॅन घेते, पण ती या दिवशी सुपरफास्ट असल्याचा अनुभव अनेक वाहन चालकांना आला आहे. हा प्रकार पुण्यापुढील खेड शिवापूर टोलनाका आणि कराडच्या अलीकडील टोलनाक्यावर घडला आहे.
www.konkantoday.com