
भाजप कामगार आघाडी सोडवणार कामगारांचे प्रश्न- अॅड. दीपक पटवर्धन
कामगार म्हणजे उपेक्षित घटक असा वेगळा दृष्टीकोन समाजात दिसतो. पूर्वीच्या काळात मुंबईमध्ये गिरणी कामगारांनी अनेक आंदोलने करून प्रश्न सोडवून घेतले. काही प्रश्न आजही सुटलेले नाही. याकरिता कामगारांना एकत्रित आणणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील या सर्व कामगारांचे एकत्रीकरण भाजपच्या कामगार आघाडीमार्फत केले जाणार आहे. त्याद्वारे कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. तसेच सोशल वेल्फेअर उपक्रम, कामगारांचे आरोग्य व त्यांच्या अन्य समस्या सोडवू, असे प्रतिपादन द. रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले.
आज सोमवारी (ता. 22 फेब्रुवारी) भाजप जिल्हा संपर्क कार्यालयात भाजप कामगार आघाडीच्या पहिल्या बैठकीत ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरवात झाली. या वेळी मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी रत्नागिरीचे निवृत्त सहाय्यक कामगार आयुक्त विश्वास जाधव यांनी असंघटित, संघटित, जॉब वर्कर आणि माथाडी कामगारांसाठी नियम, कायदेकानू यांची माहिती दिली. माथाडी व सुरक्षा रक्षक कायदा, बांधकाम कामगार कायदा आदी कायदे सांगितले. तसेच कामगारांची नोंदणी होणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. त्यानंतरच कामगारांना न्याय मिळवून देणे शक्य आहे, असे सांगितले.
कामगार आघाडी गावागावांत पोहोचून कामगार आघाडी धडाडीने काम करणार आहे. विविध ठिकाणी कामगारांवर होणारा अन्याय दूर करणे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात दौरा करण्यात येणार असल्याचे कामगार आघाडी द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष लीलाधर भडकमकर यांनी सांगितले.
या वेळी व्यासपीठावर भाजप कामगार आघाडी प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेश शेट्ये, भारतीय मजदूर संघाच्या चिटणीस संजना वाडकर, कामगार आघाडी द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष लीलाधर भडकमकर उपस्थित होते. या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष मंगेश चव्हाण, संकेत कदम, सरचिटणीस संतोष बोरकर, शहराध्यक्ष संदीप रसाळ, जिल्हा सचिव श्रीधर कबनूरकर, रत्नागिरी तालुकाध्यक्ष प्राचीन नागवेकर, हुसेन अमीनगड आदींसह कामगार आघाडीचे पदाधिकारी सहभागी झाले.
www.konkantoday.com