रिक्षा चालक ते एस टी बस चालक मिलींद शिंदे यांचा यशस्वी प्रवास ,पाच वर्षे सुरक्षित सेवेचा बिल्ला प्रदान

संगमेश्वर दि . २८ ( प्रतिनिधी ) :- रिक्षा चालक म्हणून संगमेश्वर येथे काम करत असतांना समोर जाणाऱ्या एस . टी . च्या बस पाहून नेहमी मनात यायचे की , एक दिवस ही बस चालवायला मिळाली तर ? मनात असणारी जिद्द सत्यात उतरवायचे ठरवले आणि ट्रक चालवण्याच्या सरावाला सुरुवात केली . अखेरीस एक दिवस एस . टी . मध्ये भरती झालो आणि रिक्षा चालवतांना उराशी बाळगलेले स्वप्न साकार झाले . प्रजासत्ताकदिनी पाच वर्षे सुरक्षित सेवेचा बिल्ला घेतांना हा सारा प्रवास आठवला आणि मन भरुन आले असे प्रतिपादन देवरुख आगाराचे हरहुन्नरी आणि मनमिळाऊ चालक मिलींद वसंत शिंदे यांनी केले .
प्रजासत्ताकदिनी देवरुखच्या आगार प्रमुख मृदुला जाधव यांच्या हस्ते चालक मिलींद शिंदे यांना राज्य परिवहन मंडळाच्या सेवेत पाच वर्षे सुरक्षित सेवा केल्याबद्दल त्यांना सुरक्षित सेवेचा बॅच देवून गौरवण्यात आले . राज्य परिवहन मंडळाच्या सेवेत चालक म्हणून काम करत असतांना मनात सौजन्य हे ब्रीद कायम ठेवून प्रत्येक थांब्यावर कितीही गर्दी असली तरीही प्रवाशांना बस मध्ये घेणे , प्रवाशांजवळ सौजन्याने वागणे , सहकाऱ्यांजवळ , अधिकारी वर्गाजवळ नम्रतेने बोलणे अशा गुणांमुळे मिलींद शिंदे हे प्रवासी वर्गात लोकप्रिय आहेत .
आपल्या चालक म्हणून गेल्या पाच वर्षांच्या प्रवासात राज्य परिवहन मंडळाचे वरिष्ठ अधिकारी , देवरुखच्या आगारप्रमुख मृदुला जाधव , अन्य अधिकारी आणि कर्मचारी वर्ग , वाहतूक नियंत्रक विश्वास फडके , माझे कुटूंबीय आणि सर्व प्रवासी यांचे मोठे सहकार्य लाभल्यानेच आज आपल्याला सुरक्षित सेवेचा बिल्ला मिळू शकला असे मिलींद शिंदे यांनी सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button