आरोग्य यंत्रणा चिंताजनक…. प्रामाणिक विनंती-ॲड. धनंजय जगन्नाथ भावे-भाग-१
*ॲड. धनंजय जगन्नाथ भावे ….९४२२०५२३३०
सध्या कोव्हीड-१९ च्या काळात आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर…आशा सेविकांचा पगार नाही…डॉक्टरना वेळेत मानधन नाही..वैद्यकीय अधिकारी सक्तिच्या रजेवर…कोरोना तपासणी किटचा अभाव…जिल्हा शल्य चिकित्सक नामधारी…कारभारी प्रभारी….आरोग्य खात्याच्या रुग्णवाहिकेच्या कंत्राटी चालकाना दोन महिने पगार नाही…अंशकालीन स्त्री परिचर ६ महिने मानधनापासून वंचित…सिव्हीलच्या स्क्रीनिंग ओपीडी विभागामध्ये कर्मचारी वाढवा…खेड आरोग्य विभागावर प्रचंड ताण…६३ रिक्त पदे.. १६ वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज….७२ डॉक्टर पगाराविना लढत आहेत…वगैरे वगैरे मथळ्यांच्या कोरोन कहराच्या नकारात्मक बातम्यांनी सर्वसाधारण नागरिकांच्या मध्ये भितीचे वातावरण पसरले आहे आणि ते स्वाभाविकच आहे. कोव्हीड-१९ ची आपत्ती ही अचानक आलेली आपत्ती आहे हे कोणीही नाकारीत नाही आणि तशा प्रकारची आपत्ती आपल्या जिल्ह्यातही प्रथमच आल्याने आरोग्य यंत्रणेचा गोंधळ उडणेही स्वाभाविकच होते हेही नि:संशय. आता सर्वांनीच हेही मान्य केले आहे की जे डॉक्टर, नर्सेस, आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी, आशा सेविका आणि सर्व संबंधितांनी त्यांच्या संपूर्ण क्षमतेनुसार कामही केले आणि आजही त्याच ताकदीने करत आहेत यात शंकाच नाही. गोंधळ उडाला तो अपुऱ्या सेवेमुळे, म्हणजेच डॉक्टरांच्या, सेविकांच्या, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तुटपुंज्या संख्येमुळे. वैद्यकीय सेवेत नोकरीसाठी कोणी पुढेच येत नाही अशी हतबलता आरोग्य खात्याने नामदार उच्च न्यायालयातील याचिकेमध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये स्पष्टपणे व्यक्त केली आहे. अर्थातच आरोग्य खात्यामधील रिक्त जागा का भरल्या जात नाहीत याचे कारण काय असावे हे मात्र तेथे नमूद केलेले नाही. शासनाला ते कारण चांगलेच माहिती आहे. अधिकार नाही, पगाराची तुटपुंजी रक्कम आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नोकरीची हमी नाही हीच ती नोकरी न स्वीकारण्याची कारणे आहेत. कारण भरती करावयाच्या जागा तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत, त्यात एकतर नोकरीची हमी नाही आणि सध्या ज्या बातम्या ऐकतो त्याप्रमाणे जो काही तुटपुंजा पगार मिळणार तोही वेळेवर मिळेल याचीही हमी नाही. कायम स्वरूपी रिक्त जागा भरावयाच्या नाहीत आणि केवळ कोरोना कालावधीसाठीच काही जागा निर्माण करून भरावयाच्या ही बाबही आता नामदार उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आलेली आहे आणि त्यानी याबाबत शासनाकडे विचारणाही केली आहे असे कळते.
मला आठवते, साधारणपणे १९७४ ऑक्टोबर मध्ये मी माझ्या लॅबोरेटरीच्या व्यवसायाला सुरुवात केली होती. त्या काळामध्ये काही टेस्ट सिव्हील मध्ये होत नसत. त्या करण्याकरिता माझेकडे पेशंट येत असत. त्यानिमित्ताने माझा सिव्हील हॉस्पिटलशी संबंध येत असे.त्यानिमित्तानेही तेथील डॉक्टर आणि अन्य कर्मचारी यांचेशी संबंध वेळोवेळी येत असे. रत्नागिरीमध्ये रक्तपेढी नसल्याने डॉक्टरनी त्याबाबत काय करता येईल अशी चर्चा केली. माझेकडे रक्तगट तपासणी कीट असल्याने आणि सामाजिक क्षेत्रात आणि मित्र मंडळीमध्ये संपर्क असल्याने मी ५० ते ६० जणांचे रक्तगट तपासून त्याची यादी करून ठेवली आणि गरज पडल्यास मीही समाज कार्य म्हणून सिव्हील मध्ये स्वत: रक्त दात्याला नेऊन स्वयंस्फूर्त रक्तदान करण्यासाठी मदतकरीत होतो. रक्त घेण्यासाठी त्यावेळी अक्षरश: सुया परत परत उकळून वापरल्या जात असत आणि त्याचा रक्त घेतांना रक्तदात्याला खूप त्रास होत असे. वास्तविक त्यावेळी आत्ता मिळणारे एकदा वापरून टाकून द्यावयाचे ब्लड कलेक्शन सेट (डिस्पोजेबल) मिळू लागले होते. पण आपल्याकडे ते उपलब्ध नव्हते. मला आठवत की त्यावेळी आर एम ओ असलेले डॉक्टर क्षीरसागर यांनी ताबडतोब ही महत्वाची गरज लक्षात घेऊन तसे सेट मागवून घेतले. कोणतीही लाल फीत आडवी आली नाही. आणि इच्छा असली की सर्व काही करता येते हे त्यांनी दाखवून दिले. अर्थात त्यावेळी तेथील सिनिअर टेक्निशिअन मेहता साहेब यांनीही माझ्या मागणीला बहुमूल्य पाठींबा देऊन ती बाब डॉक्टरांच्या स्पष्टपणे निदर्शनास आणून दिली. इतकेच नव्हे तर रक्तदात्याला रक्तदान केल्यावर कॉफी आणि बिस्कीट पुडाही देण्याची व्यवस्था सुरु केली.
त्यानंतर मात्र काही कालावधीनंतर १९७९-८० चे सुमारास सिव्हील मधील कारभार कोलमडण्यास कधी सुरुवात झाली कळलच नाही. काही वैद्यकीय अधिकारी संबंधित असल्याने लक्षात आले की सिव्हील मध्ये आता डॉक्टरांची संख्या खूपच कमी झाली होती. केवळ तालुक्यातूनच नव्हे तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून सिव्हिलमध्ये येणाऱ्या पेशंटची संख्या लक्षात घेता मंजूर संख्या जास्ती असताना सुद्धा जेमतेम २-४ डॉक्टर काम करीत होते. मी याविषयी सामाजिक भान ठेऊन वृत्तपत्रात एक लेख लिहिला. शासन संवेदनशील होते आणि केवळ पंधरा दिवसातच सुमारे ८ ते ९ डॉक्टर नव्याने हजार झाले आणि सिव्हीलचे काम सुरळीत झाले.परंतु पगाराबाबत आज जी अवस्था आहे तीच अवस्था त्याकाळी सुध्दा झाली होती. पे स्लीप वेळेवर न येणे त्यामुळे दोन दोन महिने पगार न होणे हे चालू झाले. अशा परिस्थितीत बीड, परभणी इतक्या दूरवरून आलेले डॉक्टर आपले जीवन कसे जगतील बरे? तरीही बोलू नये परंतु गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत करून डॉक्टरांनी त्यांची सेवा चालूच ठेवली हा त्यांचा मोठेपणा! आज आपण ओरड करतो ते सरकारचे वैद्यकीय सेवेकडे दुर्लक्ष्य होण्यास तेव्हाच सुरुवात झाली होती. नवीन सेवा सुरु करावयाची पण त्याला पुरेशी आर्थिक मदत द्यायची नाही. एकदा तर ग्रामीण भागातील जनतेसाठी दंत-चिकित्सेची सोय करण्यासाठी फिरते दंतचिकित्सालय म्हणून एक मोठी गाडी शासनाकडून सिव्हिल हॉस्पिटलकडे देण्यात आली. दंतवैद्यकाची नेमणूक झाली पण ती इतक्या उशीरा की तोपर्यंत गाडी बंद आणि गंजत चालली होती. मी त्यावेळी ही या पांढऱ्या हत्तीविषयी लेख लिहिला आणि सुदैवाने ती गाडी दंतवैद्यकांसह जिल्ह्याचे दौरे करू लागली पण त्याचे पुढे काय झाले ते कोण जाणे. त्यानंतर हळू हळू लाल फितीचे रंग दिसू लागले.औषध खरेदी, साधन सामुग्री आणि अन्य खरेदीचे संशयित आर्थिक व्यवहार सुरु झाले. तो पर्यंत वैद्यकीय सेवा ही उदात्त भावना सरकारी हॉस्पिटल मध्ये ही होती. कालाय तस्मै नाम: असे म्हणू या. मला त्याचे काही दु:ख नाही, पण या सर्वाचा रुग्ण सेवेवर परिणाम दिसू लागला. रुग्णांच्या नातेवाईकांना औषधे बाहेरून आणावी लागू लागली. हळूहळू रुग्ण आणि डॉक्टर यांचेमध्ये मध्यस्तांची गरज वाटू लागली. हे मध्यस्त कोणी पत्रकार , तर कोणी राजकीय पक्ष कार्यकर्ते तर अन्य कोणी असेच कथित सामाजिक कार्यकर्ते अशा विविध क्षेत्रातून येऊ लागले. परंतु यात झालं काय सिव्हिलमध्ये कशाला जायचे असा सर्वसाधारण समज जनतेमध्ये होऊ लागला. सगळेच असे होते असा माझा आक्षेप नाही पण त्यातील प्रामाणिक आणि आर्थिक व्यवहारापेक्षा माणुसकी जपणारे फारच कमी. हे सर्व मी वैद्यकीय विषयासाठी संबंधित व्यवसायामध्ये असल्याने मला जाणवत होते, पण मीएकटा असल्यानेहे सर्व प्रकार केवळ पहात होतो. लोकप्रतिनिधींच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या शब्दाला मान होता त्यातून आपल्या पेशंटला चांगले उपचार मिळाले कि बस झाले असे त्यांचे विचार दिसले. त्यामुळे मुलभूत सोयी सुविधांकडे कोणी लक्ष देण्यास कोणीच तयार झाले नाही.सिव्हिल हॉस्पिटलच्या संदर्भात एक स्थानीय समिती असे. (आता सुध्दा असेल कदाचित) पण त्या समितीवर राजकीय पक्षातले आणि ज्यांचा वैद्यकीय विषयाशी सुतराम संबंध नाही असे मेंबर होते. सिव्हिल हॉस्पिटलमधील सेवा-सुविधा यांचेशी त्यांना काही देणे-घेणे नव्ह्ते असे चित्र दिसून येत होते. याबरोबरच गैरसमजातून डॉक्टरना मारहाण, डांबर फासणे. धमकी देणे असेही प्रकार सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुरु झाले होते याची तर सर्वांनाच कल्पना आहे. मग अशा प्रकारातून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या, मग त्यामुळे वैद्यकीय अधिकारी कमी, नियमित भरती नसल्याने अपुरा कर्मचारी वर्ग ही दुर्दैवी चक्र सुरूच झाले आणि ते आजही चालू आहेच असे खेदाने म्हणावे लागते. गेल्या ५- ६ वर्षात तर सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे एक मजेशीर खेळच झाला आहे. सी. टी. स्कॅनसारखे मोठे आणि किमती मशीन मिळाले तर ते सांभाळण्यासाठी तज्ञ डॉक्टर नाही, तो येईपर्यंत मशीन बिघडलेले. हे एक उदाहरण झाले. नवीन बिल्डींग झाली तर त्यामध्ये बेडस नाहीत, पेशंट ठेवण्यासाठी सोयी-सुविधा नाही असे दुर्दैवाचे खेळ चालूच राहिले. वॉर्डमध्ये बेडस टाकल्याचे फोटोही आपण बघितले, पण पुढे काय…