रत्नागिरी चे पहिले थेट नगराध्यक्ष,नितीवान नेते डॉ.जगन्नाथ शंकर केळकर

0
930

रत्नागिरीच्या राजकारणातील व समाजजीवनातील लोकमान्य नेतृत्व व आदर्श नेते असलेले रत्नागिरी चे पहिले थेट नगराध्यक्ष कै डॉ. जगन्नाथ शंकर केळकर यांची आज सोमवार दि. १७ ऑगस्ट २०२० रोजी ९३ वी जयंती! माझ्या पूर्वीच्या आणि पुढील पिढीला त्यांचे कार्य सतत प्रेरित करत राहील. कर्तव्यदक्ष,शिस्तबद्ध पारदर्शी राजकारणी, प्रामाणिक नेते, नीतिवान व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख रत्नागिरीकरांना लक्षात राहील. डॉ. केळकर यांचे जीवन म्हणजे एक आदर्श पुस्तक आहे जे प्रत्येक राजकीय नेत्याने वाचून त्यांच्या आदर्शावर चालण्याचा प्रयत्न केला तर रत्नागिरीचा नावलौकिक वाढेल. डॉ. १९६५ साली जनसंघातर्फे प्रथम नगरसेवक झाले, १९६७ ते १९७१ या कालावधीत दोन वेळा त्यांनी नगराध्यक्ष पद भूषवले. १९७४ ते १९८१ या काळात ते रत्नागिरी चे प्रथम थेट नगराध्यक्ष म्हणून विराजमान झाले व कारकीर्द गाजविली. राज्यात त्यावेळेला सर्वत्र काँग्रेसचे थेट नगराध्यक्ष निवडून आले होते, मात्र राज्यामध्ये जनसंघाचे २ थेट नगराध्यक्ष निवडून आले होते त्यातील एक म्हणजे रत्नागिरीतून डॉ. केळकर.
डॉ. केळकर यांनी अकरा वर्ष नगराध्यक्ष म्हणून सर्वोत्तम कार्य केले. रत्नागिरी भाजपा जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र भाजप प्रदेश सदस्य, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, न्यू एज्युकेशन सोसायटीचा कार्याध्यक्षपद त्यांनी भूषवलं जिल्हा कुस्ती असोसिएशन, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे, भगवती मंदिर जीर्णोद्धार समिती, भागोजीशेठ कीर स्मारक समिती, कवी केशवसुत स्मारक समिती, मराठी संमेलनाचे स्वागत समिती आदींचे त्यांनी अध्यक्षपद भूषवलं. त्यांच्यात कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, व्यायाम शाळा, नवीन भाजी मार्केट, शाळा क्रमांक दोनची इमारत, वेदपाठशाळा आदी अनेक कामे यशस्वीरित्या पूर्ण झाली. रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय, भागोजी शेठ विधी महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण केळकर यांच्या कारकिर्दीत झालं.
१९७८ व १९९० साली महाराष्ट्रातल्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांकडून उमेदवारी जवळपास निश्चित झाल्यानंतर देखील ऐनवेळी पक्षीय पातळीवरील राजकीय घडामोडींमुळे दोन वेळा आमदारकीचे तिकीट त्यांना नाकारण्यात आलं. त्याहीवेळी कोणत्याही स्वरूपातील बंडखोरी किंवा नाराजी व्यक्त न करता पक्षादेश शिरसावंद्य मानून पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना तन-मन-धन अर्पून विजयी करण्यात त्यांनी योगदान दिलं. आजच्या काळातील नवीन पिढीच्या राजकारण्यांना घेण्यासारखे हे प्रसंग आहेत.
रुग्णसेवेसाठी कित्येक किलोमीटर चालून, नदी पार करून डॉक्टर ग्रामीण भागातील रुग्णांसाठी आपली सेवा देत असत. गरीब रुग्णांकडून नाममात्र शुल्क तसंच काही वेळेस मोफत सेवा देत असत. रत्नागिरीमध्ये केळकर यांची ख्याती राजकारणापलीकडील लोकमान्य नेते अशी होती.त्यांची ख्याती सर्व जाती, धर्म, पंथ, वर्ग, क्षेत्र,स्तरातील व्यक्तीमध्ये होती व आजही आहे. जेव्हा जेव्हा रत्नागिरीचे आणि रत्नागिरी मध्ये झालेल्या विकासाचे नाव काढले जाते तेव्हा डॉक्टर केळकर यांचे नाव जनतेच्या तोंडी पाहिले येते व हे नाव कायम जनतेच्या तोंडी येत राहील.
डॉ. जगन्नाथ शंकर केळकर यांच्या ९३ व्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन.
हृषिकेश विश्वनाथ सावंत (पत्रकार)
सचिव, लाईफलाईन फाऊंडेशन
रत्नागिरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here