सुप्रसिध्द बॅडमिंटनपटू कै. नंदू नाटेकर यांना विनम्र श्रध्दांजली….

ॲड. धनंजय जगन्नाथ भावे.-

९४२२०५२३३०

तसा बॅडमिंटन हा उच्चभ्रूंचा खेळ असा सन १९७३-७४ चे दरम्याने एक सर्वसाधारण समज होता. आणि तेही खरेच होते म्हणा. स्वच्छ पांढरी हाफ पॅंट, तसाच टी शर्ट, पांढरे बूट आणि तसेच मोजे अशा युनिफॉर्म मध्ये जाणारी मोठ मोठी व्यक्तिमत्वे आम्ही नेहमीच पहात होतो. त्यामध्ये बरेचदा डॉक्टर, वकील, व्यावसायिक इत्यादींचा प्रामुख्याने समावेश असे.

दरम्याने नेहमीप्रमाणे बिगिनर्स म्हणून वरच्या आळीतील भगवान अण्णा जोशींच्या अंगणातील ओपन कोर्टवर बॅडमिंटन खेळावयास सुरुवात केली. त्यानंतर बालमित्र बाबा परूळेकर वकील यांच्या ओळखीने फाटक हायस्कूलच्या पुरुषोत्तम स्मृती हॉलमधील काही मंडळींच्या बॅडमिंटन क्लबमध्ये सकाळी ५च्या बॅचमध्ये प्रवेश मिळाला आणि बॅडमिंटन खेळाचा खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला.

क्लिनिकल लॅबोरेटरीचा बैठा व्यवसाय असल्यामुळे कोठेतरी शरीर हालते राहिले पाहिजे आणि त्या निमित्त्ताने व्यायाम झाला पाहिजे एवढ्याच हेतूने बॅडमिंटन खेळाची सुरुवात झाली. त्यामुळे कोणत्याही सामन्यात भाग घेण्याचा कधीच उद्देश नव्हता. पण लकी डबल्स हा इव्हेंट आकर्षक होता त्यामुळे कंपलसरी भाग घ्यावा लागला. पार्टनर होता माझ्या जवळच्या क्लासमेटचा भाऊ विश्वास उर्फ विश्या मलुष्टे आणि कसे बसे अंतिम फेरीत पोहचल्यावर डॉ. पानवलकर यांच्या सारख्या मातब्बर खेळाडू आणि त्यांचा पार्टनर या जोडीबरोबर.. विश्या त्याला ताप आलेला असतांनाही अप्रतिम खेळला आणि त्याचे म्हणण्याप्रमाणे मी त्याला चांगली साथ दिली आणि आम्ही लकी डबल्स फायनल जिंकली. तरीही मला माझ्या खेळाची मर्यादा ओळखून कधीही स्पर्धात्मक खेळामध्ये भाग घ्यावासा वाटला नाही.

मात्र त्या विजयानंतर मला डॉ. पानवलकर, विष्णू गोगटे, अप्पा वणजू, मदन चव्हाण अशा रत्नागिरीमधील दिग्गज खेळाडूंच्या क्लबमध्ये प्रवेश मिळाला आणि काही प्रमाणात मला खेळामध्ये आवडही निर्माण झाली. डॉ. पानवळकर हे सर्वात आक्रमक खेळाडू म्हणून प्रसिध्द होते आणि तसे ते निर्विवादप्रमाणे नंबर १ वरही होते. त्यांचा आणि इतर खेळाडूंचा खेळ पाहून मला माझ्या मर्यादेप्रमाणे काही प्रमाणात खेळामध्ये सुधारणा करता आली. विशेषत: विष्णू गोगटे मला नेहमीच प्रोत्साहन देत असत. कै. मामा हजारे हे खेळाडूही तर माझे सदैव पाठीशी होते.

दरम्याने रत्नागिरी जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या रौप्य महोत्सवानिमित्त रत्नागिरी येथील डायमंड शामरॉक कंपनीच्या एम आय डी सी मधील बॅडमिंटन हॉलमध्ये सामने भरविण्यात आले होते. लकी डबल्स मध्ये माझे पार्टनर विष्णू गोगटे होते. अपेक्षेनुसार आम्ही फायनलला पोहोचलो. पण आता गाठ होती नेहमीप्रमाणे डॉ. पानवलकर आणि पार्टनर या मजबूत जोडीशी. त्यातच गोगटे बरीच वर्षे डॉक्टरांचे नियमित पार्टनर म्हणून खेळणारे. पण आम्ही दोघेही टिळक आळीमधील रहिवासी.. गोगटे यांच्या जोरदार खेळाच्या आधारे आम्ही लकी डबल्स फायनल जिंकलो.
आणि माझ्या आयुष्यातील बॅडमिंटन या खेळातील सुवर्णक्षण मी अनुभवला…

येतील की नाही, आपले आमंत्रण स्वीकारतील की नाही अशा संभ्रमित असलेले आम्ही सर्व असोसिएशनचे पदाधिकारी आमचे निमंत्रण स्वीकारून मा. नंदू नाटेकर यांच्या उपस्थितीने अक्षरश: भारावून गेलो. नाव ऐकलेले पण प्रत्यक्षात जवळून पाहण्याची संधी आम्हाला लाभली हे भाग्यच. त्यांचेजवळ गप्पा मारतांना कधीही ते परके वाटले नाहीत किवा प्रसिद्ध बॅड्मिंटनपटू म्हणून काहीच वेगळेपण वाटले नाही. एक निर्गर्वी व्यक्तिमत्व असाच त्याचा अनुभव आला.

त्यातही कै. नंदू नाटेकर यांनी एक प्रदर्शनीय सामनाही खेळला. तोही पाहण्याचे भाग्य लाभले. अत्यंत शांत, निर्गर्वी व्यक्तिमत्व. कोणताही आततायीपणा न करता अतिशय संयमी आणि सहज आकर्षक खेळ, यांनी सर्वच अचंबित झाले. मला आठवत, आमच्या डॉ. पानवलकर यांच्या आक्रमक खेळाला त्यांनी आपल्या सहज, संयमी आणि शांत खेळाने सहज थंड करून विजय मिळविला. मला खात्रीने आठवतं की नंदू नाटेकरांचा खेळ ७० टक्के प्रतिस्पर्ध्याची शटल्स सोडून देण्यामध्ये होता. खरेतर येथील कोर्ट त्याना नवीन पण काही क्षणातच त्यांनी अंदाज घेऊन शटल्स सोडून देण्याचा सपाटा लावला, सर्वजण त्यांच्या जजमेंटकडे पाहातच राहिले. एकादे शटल नंदू नाटेकर यांनी सोडून दिले की ते हमखास ऑऊट (बाहेर) जाणारच एवढा आत्मविश्वास असलेला खेळाडू आम्ही प्रथमच पाहिला.

सोनेपे सुहागा म्हणजे मी आणि विष्णू गोगटे यांनी लकी डबल्सचे विजेतेपदाचे बक्षिस कै. नंदू नाटेकर यांचे हस्ते स्वीकारले. बॅडमिंटन खेळामधील माझ्या आयुष्यामधील हा सर्वोच्च आणि सुवर्णक्षण होता हे मी कधीच विसरू शकत नाही. दुर्दैवाने गोगटे आपल्यात नाहीत पण त्यांच्याही भावना या क्षणी तरी माझ्या सारख्याच असत्या याबद्दल मला शंका नाही. कै. नंदू नाटेकर यांना विनम्र श्रध्दांजली…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button