गणपतीसाठी लाखो चाकरमानी आल्यास जिल्ह्यातील वैद्यकीय यंत्रणेचा कणा मोडेल -इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रत्नागिरी शाखेने केलेली भीती व्यक्त

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण सापडत असतानाच गणेशोत्सवात चाकरमानी मोठ्या प्रमाणावर कोकणात आल्यास सध्या असलेल्या आरोग्य यंत्रणेवर त्याचा ताण येवून नवीन संकट उभे राहिल. यासाठी चाकरमान्यांना जिल्ह्यात येण्यास रोखण्यात यावे असे निवेदन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रत्नागिरी शाखेने रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, गणेशोत्सवासारख्या सणासाठी मुंबईसारख्या महानगरातून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी येत असतात. ही आपली जुनी परंपरा आहे. परंतु सध्याच्या कोरोनाच्या स्थितीत मुंबईसारख्या शहरातून येणार्‍या चाकरमान्यांची संख्या मोठी असणार आहे. सध्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये कर्मचारी व डॉक्टरांची प्रचंड कमतरता असल्याने आमच्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने आमचे सदस्य असलेले डॉक्टर त्यामध्ये अस्थिरोग तज्ञ, फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट, भुलतज्ञ आदीजण विनामोबदला जावून सेवा बजावत आहेत. सध्या सिव्हिल हॉस्पिटलवरचा ताण दिवसेंदिवस वाढत चालला असून सध्या जिल्ह्यातून गंभीर रूग्ण शासकीय रूग्णालयात पाठविले जातात. त्या ठिकाणी फक्त कोविड केअर सेंटर आहे. रत्नागिरीत फक्त डीसीएच असल्याने हे रूग्ण येथे येत आहेत. रत्नागिरीतील स्थानिक नागरिकांमध्ये देखील कोरोनाचा प्रसार वाढला असून केसेसच्या संख्या वाढल्या आहेत. यामध्ये आमच्या संघटनेचे डॉक्टर सदस्य देखील पॉझिटीव्ह येवू लागल्याने त्यांची संख्या लक्षणीय आहे. रत्नागिरीतील आमच्या सदस्यांची दोन प्रतिथयश हॉस्पिटल कोरोनाच्या पॉझिटीव्ह केसेसमुळे गेले दोन सप्ताह बंद करण्यात आली आहेत. अशामुळे आमच्यावरही ताण वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत चाकरमानी आले तर रूग्णांच्या संख्येत वाढ होवून कोविडचा भडका उडू शकतो.
सध्या आमचे सदस्य खाजगी व शासकीय रूग्णालयातील कोविड ड्यूटी करत असल्याने त्यांच्यावर मोठा ताण आहे. त्यात आमचे डॉक्टर सदस्य पॉझिटीव्ह होवू लागले तर नवे संकट उभे राहिल आणि जिल्ह्‌याचा वैद्यकीय यंत्रणेचा कणा मोडेल. त्यामुळे मोठ्या संख्येने येणार्‍या चाकरमान्यांना रोखण्याचे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रत्नागिरी शाखेने केले असून कोरोनाचा प्रसार वाढला तर खाजगी ओपीडीमध्ये सुद्धा कोरोना पेशंट वाढून त्यामध्ये डॉक्टरांना बाधा होण्याचा धोका वाढणार आहे. आणि मग जिल्ह्यात कोरोनाशी लढण्यासाठी कोरोना योद्धे शिल्लक राहणार नाहीत. यासाठी आमच्या या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून त्यावर ठोस निर्णय घेण्यात यावा अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन रत्नागिरीने केली असून या निवेदनावर डॉ. निनाद नाफडे, डॉ. नितीन चव्हाण, डॉ. निलेश नाफडे या पदाधिकार्‍यांच्या सह्या आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button