लोटे औद्योगिक वसाहतीतील आणखी चार कारखान्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव,कामगारांची चिंता वाढली
खेड : लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा केमिकल्स पाठोपाठ विनीती, युएसव्हि,
केन केमिकल्स आणि कन्साई नेरोलॅक या चार कारखान्यामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असल्याने कामगारांची चिंता कमालीची वाढली आहे. या औद्योगिक वसाहतीत काम करणारा बहुतांशी कामगार वर्ग हा ग्रामीण भागातील असल्याने कोरोनाने आता थेट ग्रामीण भागातही हातपाय पसरायला सुरवात केली आहे.
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या ओद्योगिक वसाहतीतील घरडा केमिकल्स या कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण डाली होती. त्यावेळीच योग्य ती खबरदारी घेतली गेली असती तर या परिसरात कोरोनाचा प्रसार इतका मोठ्या प्रमाणात झाला नसता मात्र कंपनी व्यवस्थापनासह आरोयग यंत्रणाही गाफील राहिल्याने या कंपनीतील कोरोनाचा फैलाव झपाट्याने झाला.
परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर कामगारांच्या खासगी लँबद्वारे तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये अनेक कामगार कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. मात्र हे स्पष्ट होई पर्यंत कामगारांचे आपापल्या गावात जाणे-येणे आसल्याने कामगारांचे नातेवाईक, शेजारी यांना देखील कोरोनाची लागण होवू लागली. सद्यस्थितीत तालुक्यात जे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत त्यामध्ये ८० टक्के रुग्ण हे लोटे औद्योगिक वसाहतीशी संबंधित आहेत,
लोटे औद्यागिक वसाहतीची स्थापना झाल्यापासून या वसाहतीतील कारखान्यामध्ये काम करणे हे ग्रामीण भागातील तरुणांसाठी अभिमानाची गोष्ट होती मात्र आता या औद्योगिक वसाहतीत कोरोनाचा वणवा पेटला असल्याने मी लोटे औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात काम करतो हे सांगायला त्याच तरुणांना भीती वाटू लागली आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीत पेटलेला कोरोनाचा वणवा लवकरात लवकर विझवण्यात यश आले नाही तर हा वणवा संपुर्ण तालुक्यात पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
www.konkantoday.com