शासकीय नियमावलीचे शासकीय कार्यालयातच उल्लंघन होत असल्याचे प्रकार
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन, जिल्हा प्रशासनाने मास्क वापराची सक्ती केली आहे. मास्कचा वापर न करणार्यांकडून दंड आकारण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने अनेकदा जाहीर केले होते. मास्कसह सॅनिटायझर वापराची देखील सक्ती करण्यात आली आहे. रत्नागिरी शहर परिसरातील बहुतांशी शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये मास्कसह सॅनिटायझर वापराकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.
नगरपरिषदेच्यावतीने लॉकडाऊनच्या कालावधीत फक्त काही दिवसच मास्क न वापरणार्यांकडून दंड वसुलीची मोहीम सुरू करण्यात आली होती. काही दिवसात नगरपरिषदेने दंड वसुलीची मोहीम बंद केल्याने मास्क न वापरणार्यांची संख्या सध्या वाढत आहे. शासकीय निमशासकीय कार्यालयात मास्क, सॅनिटायझरचा वापर न केल्यास त्यांच्याकडून दंड वसुलीची जबाबदारी खातेप्रमुखांवर सोपविण्यात आली आहे. शाब्दिक संघर्ष वाढू नये यासाठी मास्क न वापरणार्यांवर कारवाई करणे खातेप्रमुखांकडून टाळले जात आहे.
www.konkantoday.com