
हर्णैतील मोबाईल टॉवर पूर्ववत करण्याची मागणी
दापोलीः- जून महिन्यामध्ये झालेल्या निसर्ग चक्रीवादळात दापोली तालुक्यातील हर्णै येथील मोबाईलचे टॉवर जमीनदोस्त झाले, परंतु दोन महिने झाले तरी याठिकाणची मोबाईलची सेवा अद्याप पूर्ववत झालेली नाही. वेळोवेळी मोबाईल कंपन्यांकडे मागणी करून देखील त्याकडे दुर्लक्ष होत आहे. तरी तातडीने मोबाईल सेवा सुरू करावी अशी मागणी हर्णै येथील ग्रामस्थांनी दापोली तहसिलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यात बीएसएनएल, आयडिया, वोडाफोन, एअरटेल आदी कंपन्यांचे टॉवर हर्णै गावात उभे करण्यात आलेले होते. परंतु निसर्ग चक्रीवादळ ने हे टॉवर जमीनदोस्त केले. तेव्हापासून आजपर्यंत या कंपन्यांनी गावातील बंद टॉवर सुरू केलेले नाहीत. कोरोना संकट असल्यामुळे शाळामधून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास दिला जात आहे. परंतु गावात कोणत्याही कंपनीची मोबाईल सेवा उपलब्ध नसल्यामूळे विद्यार्थ्यांना त्याचबरोबर गावातील पतसंस्था, सोसायटया व बँका यांच्या कामातही अडथळे निर्माण होत आहेत. त्याचबरोबर मोबाईल व इंटरनेट सेवेअभावी ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे तातडीने हर्णै गावात मोबाईल सेवा सुरू करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी या निवेदनात केली आहे.
निवेदनाची प्रत मुख्यमंत्र्यांनाही पाठविण्यात आली आहे. या निवेदनावर माजी सरपंच अंकुश बंगाल, सभापती रऊफ हजवानी, संघटना अध्यक्ष मिलींद बारटक्के, सुनिल आंबुर्ले, हाजी हशम, मोहम्मद आरीफ, योगिता हरवंडे आदी ग्रामस्थांच्या सहया आहेत.
मोबाईल कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन अधिकार्यांशी चर्चा केल्यानंतर ग्रामस्थांना दोन दिवसांत टॉवर सुरू करून देतो अशी आश्वासने दिली जात आहेत. मात्र अद्याप कार्यवाही झालेली नाही. यामुळे येथील ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
www.konkantoday.com