नाणार रिफायनरी समर्थकांचेही जाेरदारशक्तीप्रदर्शन ,समर्थकांची मोठ्या संख्येने हजेरी, अनेक पक्षांचे नेतेही सामील


नाणार रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी या प्रकल्पाला विरोध करत असताना रिफायनरीला समर्थन देणारा जो शिवसैनिक शिवसेनेचा भगवा किंवा गमछा घालून आला तर त्याचे चपलेने थोबाड रंगवा असा आदेश देऊन प्रयाण केल्यानंतर अवघ्या काही तासातच झालेल्या रिफायनरी समर्थकांच्या सभेला अनेक शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर सेनेच्या टोप्या व गमछे घालून आल्याने आता त्यांनी एक प्रकारे खासदार राऊत यांना आव्हान दिले आहे. प्रकल्पाच्या बाजूने कोणीही स्थानिक नाहीत असा दावा काल शिवसेनेच्या सभेत करण्यात आला होता. मात्र आज सागवे येथील कोचाळे मैदानावर झालेल्या नाणार प्रकल्प समर्थकांनी मोठी हजेरी लावल्याने शिवसेनेच्या दाव्या बाबत प्रश्न उपस्थित हाेत आहे. स्थानिक जनतेची बाजू निदान लोकप्रतिनिधींनी ऐकून घ्यावी अशी शिवसैनिकांसह या प्रकल्पाचे समर्थन करणार्‍या स्थानिक नागरिकांची मागणी होती. परंतु शिवसेनेने एनजीओंना हाताशी धरून विरोधाचे राजकारण चालू ठेवल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आज समर्थनार्थ झालेल्या या मेळाव्याला स्थानिक शेतकरी, नागरिक, विविध पक्ष संघटना यांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. या सभेला स्थानिक प्रकल्प समर्थक तसेच शिवसेनेच्या निलंबित केलेल्या सदस्या सौ. लक्ष्मी शिवलकर यांचेसह यांचेसह अनेक नेते माजी आमदार प्रमोद जठार आदीजण उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रमोद जठार यांनी खा. विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. खा. राऊत यांना निवडून आणण्यास आम्हीच मदत केली. आता २०२४ साली ते पुन्हा निवडून येणार नाहीत असे सांगून जठार म्हणाले की, या ठिकाणी रिफायनरी झाली तर या भागाचा मोठ्या प्रमाणावर विकास होणार आहे. या ठिकाणी चांगल्या दर्जाचे पोर्ट उभे रहावे तसेच अद्यावत रुग्णालय व्हावे व याठिकाणी स्मार्टसिटी उभारा आणि मग प्रकल्प उभारा अशी आमची मागणी आम्ही केंद्राकडे केली असल्याचे सांगितले. आज कोकणातील ८० टक्के घरे बंद आहेत. त्यामुळे असे प्रकल्प आले तरच येथील स्थानिकांना रोजगार मिळू शकणार आहे.
कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्यावतीने व अन्य रिफायनरी समर्थकांनी आज सभेचे आयोजन केले होते. यामुळे सध्या नाणार रिफायनरी समर्थकांची संख्या वाढत चालल्याचे दिसत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button