मुरूड येथे आतापर्यंत 156 व्यावसायिकांना ‘सीआरझेड’ उल्लंघनाच्या नोटिसा

दापोली : भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या सततच्या दापोली वारीने मुरुडच्या पर्यटन क्षेत्रावर परिणाम होत आहे. दिवसेंदिवस येथील व्यावसायिक अडचणीत येत आहे. येथे सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केले म्हणून यापूर्वी येथील 150 पर्यटन व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या. नुकत्याच झालेल्या सोमय्या यांच्या दापोली दौर्‍यानंतर येथील 6 व्यावसायिकांना नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यामुळे आता ही संख्या 156 वर पोहोचली आहे. या कारवाईची माहिती दापोली प्रांत कार्यालय यांच्याकडून देण्यात आली. तर जिल्हाधिकारी यांच्या पत्रानुसार ही कारवाई करण्यात आली, असे देखील कार्यालयातून सांगण्यात
आले.
दापोली मुरूड समुद्रकिनारी असणारे साई रिसॉर्ट हे मंत्री अनिल परब यांचे आहे. येथे सीआरझेडचे उल्लंघन करून हे रिसॉर्ट बांधण्यात आले आहे, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वारंवार केला आहे. या रिसॉर्टवर कारवाई व्हावी म्हणून त्यांनी अनेकवेळा दापोली दौरा केला आहे. त्यामुळे येथील अन्य व्यावसायिकांनाही आता सीआरझेडच्या नोटिसा येत आहेत.
दापोली तालुक्यातील मुरूड समुद्र किनारा हा पर्यटकांना भुरळ घालण्यासारखा समुद्र किनारा आहे. इथे पर्यटकांसाठी समुद्री सफर, घोडागाडी आदींसारख्या सुविधा आहेत. त्यामुळे या समुद्र किनार्‍याला पर्यटकांची अधिक पसंती आहे. येथे मुंबई, पुणे या शहरांतील अनेकांनी पर्यटन व्यवसायात गुंतवणूक केली आहे. तर अनेकजण  येथे गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. मात्र येथील साई रिसॉर्ट हे प्रकरण राज्यात आणि दिल्ली दरबारी गाजल्यानंतर येथे पुण्यासारख्या शहरातील जवळपास 140 गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेतली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे येथील पर्यटनाला मोठा फटका बसणार
आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button