
शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरीच्या प्राचार्यपदी डॉ. सिमिकेरी; ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर दीपक शिंदे सेवानिवृत्त

रत्नागिरी : येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील प्राचार्य दीपक माणिक शिंदे हे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ आणि गौरवशाली शासकीय सेवेनंतर ३१ डिसेंबर रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या रिक्त झालेल्या जागी नूतन प्राचार्य म्हणून डॉ. चंद्रकांत येलगुरदरय्या सिमिकेरी यांनी आज (१ जानेवारी) रोजी पदभार स्वीकारून संस्थेच्या कामकाजाला सुरुवात केली.
प्राचार्य दीपक शिंदे यांनी आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेमध्ये तंत्रशिक्षण विभागात विविध पदांवर काम करत असताना आपला ठसा उमटवला. रत्नागिरी तंत्रनिकेतनच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त संस्थेच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिंदे साहेबांच्या कामाचे कौतुक करून त्यांना भावी आयुष्यासाठी आणि पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.
नूतन प्राचार्य डॉ. चंद्रकांत सिमिकेरी यांनी आज सकाळी संस्थेत रुजू होऊन आपला पदभार स्वीकारला. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री. अवधूत देवकर यांनी डॉ. सिमिकेरी यांचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले. तसेच, संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी नूतन प्राचार्यांचे उत्साहात स्वागत केले.
या प्रसंगी बोलताना अवधूत देवकर म्हणाले, “प्राचार्य शिंदे यांचे सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य सुख-समृद्धीचे व भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तसेच, नूतन प्राचार्य डॉ. सिमिकेरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था शैक्षणिक क्षेत्रात नक्कीच नाव लौकिक मिळवेल.”




