
नगर परिषदेचा निषेध करण्यासाठी काळ्या छत्र्या उघडून नागरिक करणार आगळे आंदोलन
रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यापासून शहरातील अन्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत.शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय झाले आहेत.असे असूनही नगर परिषद प्रशासन ढम्म आहे. यामुळे याचा निषेध करण्यासाठी रत्नागिरीकर नागरिक उद्या सोमवारी सकाळी 11 वाजता नगरपरिषदेमध्ये एकत्र जमून काळ्या छत्र्या उघडून शांततापूर्ण पद्धतीने निषेध करणार आहेत. यासाठी रत्नागिरीकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे सामाजिक कार्यकर्ते राजू किर यांनी आवाहन केले आहे.रत्नागिरी नगर परिषद नागरिकांकडून कर वसूल करीत आहेत. त्यामुळे चांगले रस्ते मिळणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे.त्यासाठी लोकप्रतिनिधींना निवडून दिले आहे. असे असूनही शहरातील सर्व रस्ते खड्डेमय झाले आहेत. गणपती सणापूर्वी खड्डे बुजवणार व रस्ते चांगले केले जातील असे आश्वासन नगराध्यक्ष बंड्या साळवी यानी दिले होते.रस्त्यांचे खड्डे भरण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले.प्रत्यक्षात हे खड्डे आहेत तसेच राहिल्याने गणपती बाप्पाचे विसर्जनही करण्यासाठी खड्डेमय रस्त्यातूनच मोठी कसरत करत नागरिकांना जावे लागले.यामुळे नागरिकांच्यात मोठ्या प्रमाणावर नाराजी असून त्यासाठी ते शांततेच्या मार्गाने निषेध करणार आहेत.
www.konkantoday.com