खेडचे सुपुत्र अरविंद मोरे यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित
रत्नागिरी: खेड मोहाने गावचे सुपुत्र अरविंद दादाजी मोरे यांना सीबीआयमधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपतींकडून जाहीर झालेले पोलीस पदक नुकतेच भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रंजन गोगाई यांच्या हस्ते देवून त्यांना सन्मानित करण्यात आले. श्री. अरविंद मोरे यांनी १९९१ साली कला शाखेतून पदवी संपादन केल्यानंतर सीबीआय मुंबई येथे भ्रष्टाचार विरोधी शाखेत आपल्या नोकरीला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक परीक्षा देवून बढती मिळवली. उपनिरीक्षक पदावर त्यांची सीबीआय मुंबईच्या शाखेमध्ये २००१ मध्ये नियुक्ती झाल्यानंतर २००५ मध्ये त्यांना पोलीस निरीक्षक पदावर बढती मिळाली होती. २००९ ते २०१४ या कालावधीत त्यांनी सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेत व विशेष गुन्हे शाखेत गुंतागुंतीच्या प्रकरणांच्या तपासात त्यांचा सहभाग होता. २०१६ मध्ये त्यांना पोलीस उपअधिक्षक पदावर बढती देण्यात आली होती. त्यावेळी त्यांना सीबीआयमधील त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपतीपदक जाहीर झाले होते. १३ ऑगस्ट २०१९ रोजी दिल्लीमध्ये विज्ञानभवनमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगाई यांच्या हस्ते त्यांना हे पदक देवून सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
www.konkantoday.com