रत्नागिरीत कोकेनचा साठा मिळाल्याने अनेक प्रश्न उपस्थित टोळक्याच्या म्होरक्याच्या शोधासाठी पोलिसांनी फिल्डींग लावली
रत्नागिरी ः रत्नागिरी एमआयडीसीमध्ये ५० लाखांचे कोकेन सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती. जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिरीष सासणे व ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुरेश कदम यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावल्याने यातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले. परंतु रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सापडलेल्या कोकेनच्या साठ्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याला कारण म्हणजे या आरोपींमध्ये किनार्याचे संरक्षण करणार्या तटरक्षक दलाचे कर्मचारी सामील असल्याने याचे गांभीर्य वाढले आहे. ज्यांनी अशा गोष्टी रोखायच्या असतात त्या यंत्रणेतील काही अधिकारी केवळ पैशाच्या आमिषासाठी यामध्ये गुंतले गेल्याने काही प्रमाणात सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
ज्याअर्थी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कोकेन आणण्यात आले होते त्यामागे मोठी चेन असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यादृष्टीने या प्रकरणामागील मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची पथके अनेक राज्यात रवाना झाली आहेत. हे कोकेन नेमके कुणासाठी आणले होते. रत्नागिरीसारख्या ठिकाणी त्याला एवढी मागणी असेल तर या मादक पदार्थांच्या विळख्यात तरूण वर्ग सापडला आहे की काय? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
www.konkantoday.com