
सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची देवगड पोलीस ठाणे हद्दीत धडक कारवाई, तब्बल ७ लाख १८ हजार ५६० रुपयांची गोवा व महाराष्ट्र बनावटीची विदेशी दारू जप्त
सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने देवगड पोलीस ठाणे हद्दीत धडक कारवाई करत तब्बल ७ लाख १८ हजार ५६० रुपयांची गोवा व महाराष्ट्र बनावटीची विदेशी दारू जप्त केली आहे.या प्रकरणी तिघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३० जून २०२६ रोजी रात्री १०.०५ वाजण्याच्या सुमारास देवगड तालुक्यातील मिठबाव येथील वळंजू यांच्या कॉम्प्लेक्समधील एका खोलीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकला. या कारवाईत गोवा व महाराष्ट्र बनावटीच्या दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ७,१८,५६० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणी श्रीकांत चव्हाण (रा. मिठबाव, ता. देवगड), विनोद वळंजू (रा. देवगड) आणि पप्पू कुडतरकर (रा. कुडाळ) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई), ८१ व ८३ अन्वये देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




