
विक्रांत जाधव ठाकरे शिवसेनेचे नवे जिल्हाप्रमुख
आमदार भास्कर जाधव यांनी केला सत्कार : शिवसेनेत उत्साह
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि युवा सेना कोअर कमिटी सदस्य विक्रांत जाधव यांची निवड पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. पक्षाचे मुखपत्र असलेल्या “सामना”मधून त्यांच्या निवडीची घोषणा आज करण्यात आली.
या निवडीनंतर चिपळूण येथील संपर्क कार्यालयात आले असता शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. विक्रांत जाधव यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून कमी कालावधीत अत्यंत प्रभावशाली अशी कामगिरी केली. जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी या काळात केले. मंत्रालय स्तरावर बैठका घेऊन अनेक धोरणात्मक निर्णय त्यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात घेतले. आज जिल्हा परिषदेची दिमागदार इमारत उभी राहत आहे त्याचे श्रेयदेखील विक्रांत जाधव यांना जाते. त्यांच्याच प्रयत्न व पाठपुराव्यामुळे या इमारतीला निधी मंजूर होऊ शकला.
शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विक्रांत जाधव यांना राज्य पातळीवर युवा सेनेच्या कोअर कमिटीमध्ये समाविष्ट करून घेतले. या काळात त्यांनी कोकणासह राज्याच्या वेगवेगळ्या भागांचा दौरा करून युवा सेनेचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी मेहनत घेतली.
प्रशासकीय कामकाजाची असलेली उत्तम जाण, अभ्यास आणि त्याचबरोबर संघटन कौशल्य त्यामुळे प्रशासन व संघटन अशा दोन्ही ठिकाणी त्यांनी आपली छाप पडली आहे. त्यामुळे पक्ष संघटनेत त्यांनी जिल्हा पातळीवरील जबाबदारी स्वीकारावी अशी इच्छा पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील “रत्नागिरीचा जिल्हाप्रमुख मी माझ्या मनात आहे तोच देईन,” असे उद्गार काढले होते. विक्रांत जाधव यांची निवड करून त्यांनी देखील जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची इच्छा पूर्ण केली आहे.
या निवडीनंतर आज विक्रांत जाधव हे शिवसेना संपर्क कार्यालयात आले. त्यावेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी चिपळूण, गुहागरसह जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांतून मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिकांनी गर्दी केली होती. त्यांनी फटाके वाजवून या निवडीचा आनंद व्यक्त केला आणि विक्रांत जाधव यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




