
सायले (ता. संगमेश्वर) येथील चित्रकार सारिका पांचाळ यांनी कुंचल्यातून साकारली देवीची विविध रुपे!
देवीचा उत्सव म्हणून नवरात्रीच्या उत्सवाला विशेष महत्व आहे. सायले (ता. संगमेश्वर) येथील चित्रकार सारिका पांचाळ यांनी कुंचल्यातून देवीची विविध रुपे साकारली आहेत.
सारिका पांचाळ ह्या मूळच्या मुंबईच्या. एसएनडीटी महाविद्यालयातून त्यांनी बीव्हीए ह्या विषयात पदवी घेतली. शालेय वयापासूनच त्यांना चित्रकलेची आवड निर्माण झाली. कंपोझिशन आणि निसर्ग चित्रे हे त्यांचे आवडते विषय होते. त्यात त्यांनी प्रावीण्य मिळवले. कॉलेज शिकत असताना त्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेत बक्षिसे मिळवली आहेत.
विवाहानंतर त्या गेली दोन वर्षे संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे येथे स्थायिक असून तिथे त्या आपली कला जोपासत आहेत. त्यांनी नवरात्री निमित्य देवीची विविध रुपे आपल्या चित्रातून साकारली आहेत.
ह्यात त्यांनी सुवर्णतारा, कृष्णतारा, शैलपुत्री आणि कालरात्री ही रुपे चित्रातून साकारली आहेत. हयाविषयी माहिती देताना त्या म्हणाल्या की सुवर्णतारा हे रूप भक्तांना सौभाग्य आणि स्थैर्याचा आशीर्वाद देते. कृष्णतारा हे रूप आक्रमक आहे. ह्या रूपातून देवी वाईटाचा नाश करते. मासर, यम, मामोस, राक्षस, यक्ष, किन्नर, बिमीपती आणि त्सान अशा वाईटांचा नाश करून ही देवी आपले रक्षण करते. शैलपुत्री हा देवी सतीचा अवतार असून पर्वतांचा अधिपती राजा हिमावत याची ती कन्या आहे. तर देवी कालरात्री हा माता दुर्गेचा अवतार आहे. चित्रकार रसिका पांचाळ यांनी ही सगळी चित्रे जलरंगात साकारली आहेत.




