
एल्डर लाईन 14567 ज्येष्ठांसाठी मदतीचा आधार
*रत्नागिरी, दि. 15 ): सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था आणि राज्य सरकारच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी 14567 राष्ट्रीय हेल्प लाईन ही सेवा देशभरातील सर्व राज्यात आणि केंद्रशाषित प्रदेशात वयोवृद्धांसाठी सुरु करण्यात आली आहे. जनसेवा फाउंडेशन, पुणे यांच्या मार्फत ही सेवा महाराष्ट्रात राबवली जात आहे. मानवसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य घेऊन संस्थापक अध्यक्ष डॉ. विनोद शहा (MD) यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा फॉउंडेशन पुणे गेली 37 वर्षापासून सातत्याने आपल्या विविध प्रकल्पाद्वारे गरीब, आजारी, वृध्द, अपंग, निराधार, गरीब मुले, मुली आणि महिला यांची सेवा करीत आहेत. जनसेवा फाउंडेशनला संयुक्त राष्ट्रसंघाचा विशेष दर्जा प्राप्त आहे.
घरात आम्ही दोघं एकटेच, मुलगा परदेशात आहे…,नातेवाइकांनी आमचं घर बळकावलंय…, कुटुंबात कुणाशी बोलणंच होत नाही… अशा असंख्य व्यथा, वेदना, तक्रारी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक एल्डर लाईन हेल्पलाइनवर मोकळेपणाने मांडत आहेत. ऑगस्ट 2021 पासून सुरु झालेल्या या 14567 राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाइनवर आतापर्यंत 4 लाखांहून अधिक कॉल्स आले असून, 30 हजारांहून अधिक प्रकरणांमध्ये क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष मदत करण्यात आली आहे.
हेल्पलाइनद्वारे मिळणाऱ्या मोफत प्रमुख सेवा:
· माहिती:आरोग्य, पोषण, निवारा, आश्रयगृह व वृद्धाश्रम, डे केअर सेंटर याबाबत माहिती.
· मार्गदर्शन: कायदेविषयक, मालमत्ता व कौटुंबिक वादांमध्ये मोफत कायदेशीर सल्ला, पेंशन योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007
· भावनिक आधार – मानसिक आजार व चिंता, ताण, राग इत्यादी व्यवस्थापन.
बेघर व अत्याचारग्रस्त वृद्धांसाठी मदत आणि पुनर्वसन, कुटुंबीयांशी संवाद,पोलिस प्रशासनाशी समन्वय, समुपदेशन.
एल्डर लाईन 14567 ही केवळ हेल्पलाईन नाही तर ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विश्वासाचा हात, एक सुरक्षित आधार आहे. या माध्यमातून वयोवृद्धांच्या गरजा समजून घेतल्या जातात आणि त्यांना सन्मानाने जगता येईल यासाठी आवश्यक ती मदत दिली जाते. ज्येष्ठांसाठी ही सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी समाजातील प्रत्येकाने जागरुक व्हावे आणि सर्व गरजू वयोवृद्धांनी या एल्डर लाईनचा लाभ घ्यावा, असे आवाहन जनसेवा फाउंडेशन मार्फत करण्यात येत आहे.
0000




