
वीज ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणारे मीटर हे फक्त टीओडी स्मार्ट मीटरच
टीओडी स्मार्ट मीटरच्या खर्चाचा भार ग्राहकांवर नाही, टीओडी स्मार्ट मीटरमुळे वीज बिलावर राहणार ग्राहकांचे नियंत्रण
रत्नागिरी/ सिंधुदुर्ग, : महावितरण मार्फत बसवण्यात येणाऱ्या टीओडी स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना त्यांच्या वीज वापराची माहिती दर तासानुसार (रियल टाईम) उपलब्ध होत आहे. यामुळे ग्राहकांचे त्यांच्या वीज वापरावर व पर्यायाने वीज बिलावर नियंत्रण राहणार आहे. तसेच अचूक व वेळेत बिल मिळणार आहे. टीओडी स्मार्ट मीटर हे पुर्वीप्रमाणेच पोस्ट पेड असून मीटर रीडिंगनुसारच त्याचे बिल देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांवर कोणताही खर्चाचा भार न टाकता बसवण्यात येणारे टीओडी स्मार्ट मीटर हे ग्राहकांच्या फायद्याचे असून ग्राहकांनी अफवांना बळी पडू नये व सदर टीओडी स्मार्ट मीटर बसविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
कोकण परिमंडलात सध्या नवीन वीज जोडणी करता टीओडी स्मार्ट मीटर वापरण्यात येत आहेत. तसेच वीज ग्राहकांचे पुर्वीचे जुने मीटर हे टीओडी स्मार्ट मीटरद्वारे बदलण्यात येत आहेत. टीओडी स्मार्ट मीटर बसवण्याच्या करारानुसार ठेकेदाराने मीटर बसवून या मीटरची देखभाल दहा वर्षे करायची आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात गैर समजातून ग्राहक उपयोगी टीओडी स्मार्ट मीटरना विरोध करण्यात येत आहे. हा विरोध निराधार असून ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण करत आहे.
खर्चाचा भार ग्राहकांवर नाही
सदर अद्यावत मीटर बसविल्याने महावितरणची वाणिज्यीक हानी कमी होणार आहे. तसेच वीजचोरीवर नियंत्रण येणार आहे. त्यामूळे होणाऱ्या महसूल वाढीतूनच टीओडी स्मार्ट मीटरचा खर्च भागविण्यात येणार आहे.
टीओडी स्मार्ट मीटर द्वारे ग्राहकांचे बिलावर नियंत्रण
टीओडी स्मार्ट मीटर मधून वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक युनिटची रिअल टाईम माहिती ही ग्राहकास मोबाईलवर उपलब्ध होत आहे. त्यामुळे वीज वापरानूसार रीडिंग येत नसेल तर ग्राहकास हे कळणार आहे. बसवण्यात येणारे टीओडी स्मार्ट मीटर हे राष्ट्रीय मानांकन प्राप्त लँब मधून चाचणी केलेले असल्याने ग्राहकांना वापरा इतकेच वीज बिल मिळत आहे. अत्यंत नाविण्यपुर्ण अशी पारदर्शी सुविधा वीज ग्राहकांना नव्या टीओडी स्मार्ट मीटरमुळे मिळत आहे.
मीटरमध्ये ‘टीओडी’ सुविधा गरजेची
राज्यात सुरु असणाऱ्या रुफ टॉप सोलर, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आदी योजनामुळे दिवसा स्वस्त दरात वीज उपलब्ध होत आहे. भविष्यात दिवसा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणारी वीज वापरली जावी यासाठी औद्योगिक ग्राहकांच्या धर्तीवर घरगुती ग्राहकांनाही दुपारच्या वेळी वीज दरात 80 पैसे ते 1 रुपया दरम्यान सवलत देण्याबाबतचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाने मंजुर केला आहे. सध्या बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरमध्ये टीओडी (टाईम ऑफ डे) ही सुविधा उपलब्ध असून ग्राहकांना स्वस्त वीज दराचा फायदा होत आहे. जून्या मीटरमध्ये टीओडी ही सुविधा नसल्याने ग्राहकांना दिवसा स्वस्त वीज दराचा फायदा मिळणार नाही.
महावितरणकडून जनजागृती मोहीम
सध्याचे मीटर व टीओडी स्मार्ट मीटर यांच्यातील फरक उपयुक्तता समजावी म्हणून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मंडलातील विविध कार्यालयात डेमो पीस लावण्यात आले आहेत. या दोन्ही मीटरमधून होणारा विजेचा वापर व नोंद होणारे युनिट यांचे प्रात्येक्षिक ग्राहक पाहू शकतात व आपल्या शंकांचे निरसन करू शकतात. www.konkantoday.com