
कोकणनगर-मजगाव रस्त्यावर बसचे चाक खोदलेल्या चरीत गेल्याने अपघात

रत्नागिरी : कोकणनगर-मजगाव रस्त्यावर आज (१४ ऑगस्ट) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास शहर वाहतूक करणारी बस खोदलेल्या चरामध्ये अडकून अपघात झाला. यामध्ये शाळेतील मुले आणि काही प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
माजगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रशांतनगर-विमानतळ रोड या ठिकाणी कोस्टगार्डसाठी इलेक्ट्रिक वायर अंडर ग्राउंड करण्यासाठी खोदाई करण्यात आली. या रस्त्याला साईड पट्टीच शिल्लक ठेवलेली नसल्याने वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने इथे वारंवार अपघात होत असल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले.

काल (१३ ऑगस्ट) संध्याकाळच्या सुमारासही याच परिसरात खोदलेल्या चरामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने बसचे चाक चरीत गेले होते. त्यामुळे काही काळासाठी वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला होता.
दरम्यान, या ठिकाणी योग्य माहिती मिळेल, असे फलक लावावेत जेणेकरून वाहन चालकांना वाहन चालवताना रस्त्याचा अंदाज येईल, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. अन्यथा रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीचा अंदाज न आल्यास एखादी मोठी दुर्घटना घडू शकते.





