
स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी जि. प., पं. स. गट-गणांच्या हरकतींवर सुनावणी पूर्ण
रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे गट आणि गणांच्या रचनेवर आलेल्या हरकतींवर नुकतीच कोकण आयुक्तांकडे सुनावणी झाली आहे. यावर ११ ऑगस्टपर्यंत निर्णय अपेक्षित असून त्यानंतर प्रभाग रचना अंतिम होण्याची शक्यता आहे.
कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांमधून आलेल्या हरकतींवर सुनावणी पूर्ण झाली आहे. कोकण आयुक्तांनी या हरकतींवर निर्णय जिल्हा प्रशासनाला कळवल्यानंतर प्रशासनाकडून एक सविस्तर अहवाल तयार केला जाईल आणि तो राज्य निवडणूक आयुक्तांकडे पाठवला जाईल. त्यानंतरच प्रभाग रचना अंतिम करून जाहीर केली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना रत्नागिरी जिल्ह्यातून जि. प. आणि पं. स. गट-गणांच्या -रचनेबाबत एकूण ५० हरकती दाखल झाल्या आहेत. या ५० हरकतींपैकी जवळपास ३५ हरकती या गट व गणांच्या नावांमध्ये झालेल्या बदलांशी संबंधित आहेत. उर्वरित हरकती इतर बदलांबाबत आहेत. सध्याच्या परिस्थितीनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतरच होण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com